आष्टी ।दिनांक ०५।
राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचं आज चौकार, षटकारांसह तडाखेबंद भाषण झालं. माझ्या जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी भूमिका घेताना मी कधीच मागेपुढे पहात नाही. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. मुंडे साहेबांनी तत्कालिन संरक्षण मंत्र्यांना दिलेल्या एका पत्रामुळे इथे होणारे मिल्ट्री ट्रेनिंग सेंटर रद्द झाले आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला, ते शेतकरी आजही मुंडे साहेबांचं नाव घेतात असंही त्या म्हणाल्या.
आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच यातील बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज खुंटेफळ येथे झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही
यावेळी बोलतांना ना. पंकजाताई म्हणाल्या, देवेंद्रजी, एक किस्सा आठवला. तुम्ही सीएम म्हणून तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. तुम्ही ज्येष्ठ आहात. नेते आहात. तुम्ही कॅबिनेटचे प्रमुख आहात. तुमच्या विषयी नेहमी आदरभाव असतो. पण आज ममत्व भाव येतोय. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे. त्यामुळे तुम्हाला बघताना मला आज वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा तुम्ही जसे पिक्चर म्हणता. आम्हीही पिक्चरचे वाक्य म्हणतो. शिवगामीणीचं वाक्य असतं, मेरा वचनही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धस यांना दिलंय. तेच माझं शासन आहे. गोपीनाथ मुंडेची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही, असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
मुंडे साहेबांच्या एका पत्रामुळे शेतकऱ्यांना न्याय
सुरेश धसांनी २००३ मधल्या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख केला. देवेंद्र जी फडणवीस आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला असं म्हणत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगितला. अण्णा, मी तुम्हाला अण्णा म्हणते बरं का? तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही. जशाला तसं आहे आपलं प्रेमाचं नातं. इज्जत आम्हीही देतो. पण मला आनंद वाटला. तुम्ही २००३चा उल्लेख केला. मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देते. या ठिकाणी सैनिकी छावणी होण्याचा प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री असताना झाला होता. यावेळी प्रमोद महाजन यांना गोपीनाथ मुंडे यांनी २००३च्या जानेवारीत पत्र दिलं. आणि १९ फेब्रुवारी २००३ जॉर्ज फर्नांडिस यांना पत्र दिलं. इथली ४० गावं माझी आहेत. इथं सैनिकी छावणी करू नका. इथे शेती आहे. बागायती आहे. उपसा जलसिंचन योजना करा, असं त्या पत्रात म्हटलं होतं. आजही ते शेतकरी मुंडे साहेबांच नाव घेतात, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
हा सरकारी कार्यक्रम
आपल्या जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांसाठी भूमिका घेताना मागे पुढे पाहायचं नाही ही गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. आजच्या कार्यक्रमाला मी येणार की नाही अशी चर्चा होती. का नाही येणार? सुरेश अण्णा तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं. तेव्हा साडी आणि पत्रिका घेऊन आला होता. सागरचं लग्न कराल तेव्हा बोलावलं तर येईल, नाही तर नाही येणार. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे. तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलावलं तर येईल. हा सरकारी कार्यक्रम आहे. बॅनरवर फोटो आहे का हे मी पाहिलं नाही. हा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आले असेही पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
बीड जिल्हा लकी
बीडमध्ये सहापैकी पाच आमदार निवडून येतात. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा लकी आहे. २०१९मध्ये बीडमध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले. आता आमचे आमदार निवडून आले. अजितदादांचे आमदार आपल्यासोबतच आहे. आज अजितदादा पालकमंत्री आहेत. ते आपल्याला नेहमी सहकार्य करतील. जनतेसाठी आम्ही कधीच भेदभाव करणार नाही. पालकमंत्री असताना कधी सुईच्या टोकाएवढाही भेदभाव केला नाही. आम्ही काम करत राहिलो असेही पंकजाताई मुंडेंनी म्हटले.