बीड दि. 4 (प्रतिनिधी ) : ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत, त्या जिल्ह्यांमध्ये भाजपने आपल्या काही मंत्र्यांना संपर्कमंत्री केले आहे. पक्ष, संघटना आणि सरकारमधील संपर्काची जबाबदारी या संपर्क मंत्र्यांवर असणार आहे. त्यानुसार राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे ह्यांची भारतीय जनता पक्षाने बीड जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणुन नियुक्ती केली आहे. याबद्दल पंकजाताईंचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.
पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी संपर्क मंत्र्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पक्षाच्या बैठकीत केली. जेथे इतर पक्षांचे पालकमंत्री आहेत, तेथे भाजपने मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांकडे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांकडे एकप्रकारचे जिल्ह्याचे भाजपचे पालकत्वच असणार आहे. त्यानुसार बीड जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोड़ीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्तीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, पक्षाने दिलेली ही नवीन जबाबदारी निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडू असं ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.