Prachi Amale
2 – 3 minutes
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्याचं वातावरण चांगलंच तापलं असून या घटनेचा निषेध केला जात आहे. ही घटना घडून अनेक दिवस उलटले आहेत,मात्र, या घटनेचा मुख्य सूत्रधार फरार आहे. घटनेविरोधात उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्याअगोदरच या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. सीआयडीने वेगवान सूत्रे हलवण्यास सुरुवात केली असून वाल्मिक कराडच्या पत्नीला चौकशीसाठी पोलिस स्थानकात बोलवले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. वाल्मिक कराड या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. पोलिसांनी वाल्मिक कराडवर केवळ खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वाल्मिक कराड सध्या फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. यासाठी सीआयडीने वाल्मिक कराडच्या पत्नीला पोलीस स्थानकात बोलवले आहे. सीआयडीकडून बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडच्या पत्नीची कसून चौकशी सुरु आहे.
वाल्मिक कराडच्या पत्नीबरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना लातूरमधून चौकशीसाठी बीड शहर पोलीस स्टेशनला आणले आहे. गेल्या दीड तासापासून चौकशी सुरू आहे. वाल्मिक कराड यांचे दोन्ही बॉडीगार्डला चौकशीसाठी बोलावलं आहे.
वाल्मिक कराड हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे मानले जातात. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनीही ते नाकारलं नाही. पण या प्रकरणी जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप आहे. तर मुंडेंशी असलेल्या जवळीकीमुळेचं कराडवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेजण फरार आहेत. इकडं खंडणी प्रकरणी पोलिसांनी खंडणी विष्णू चाटेला अटक केली आहे. तर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेंचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.