बीड

अर्थव्यवस्थेचा ‘सरदार’ हरपला

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव डॉ.मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. १९९१ साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. सन २००४ साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. २००८ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर २००९ साली ते दुसर्‍यांदा पंतप्रधान बनले.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. १९४७ साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. सन १९६६ ते १९६९ या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. १९७२ ते १९७६ या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. १९८२ ते १९८५ या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर १९८५ ते १९८७ या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे अध्यक्षपदावर काम केलं. सन १९९१ सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. सन १९९६ साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. २००४ साली यूपीएची सत्ता आल्यानंतर ड. मनमोहन सिंह यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. २००४ ते २०१४ या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल २०२४ साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!