बीड

हवेत गोळीबार करणार्‍या फडला अखेर पोलिसांनी खाक्या दाखविल्या, परळी ठाण्यात गुन्हा


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज): हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणार्‍या ना. धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर अखेर परळी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमांनी याबाबतचे व्हिडिओ दाखवल्यानंतर आणि सोशल मीडियातून हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केलाय. विशेष म्हणजे, बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अ‍ॅक्शन मोडमध्ये असून लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरीत आरोपीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील दहशत आणि बीडमधील गुंडागर्दीचा मुद्दा समोर आला असून बीडचा बिहार होत असल्याची टीकाही केली जात आहे. राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनीही बीडसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच, मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला होता. शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता, हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीडमधील दहशत, बीडमधील गुंडागर्दी आणि बीडमधील बंदुकधारी तरुणाईचा प्रश्न जटील बनल्याचं यामुळे समोर आलं आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुक मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण केली होती.

विधानसभा निवडणुकीतही त्याच फडने
केली होती जाधवांना मारहाण
विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी कैलास फड याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण केल्याचा व्हिडिओ विधानसभा निवडणुकांच्या काळात चांगलाच व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशीच मतदान केंद्राजवळ झालेल्या मारहाणीत कैलास फड याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील परळीच्या नेत्याला मारहाण केली होती. आता, बंदुकीतून गोळी झाडल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तोही व्हिडिओ चर्चेत आला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!