अंबाजोगाई।दिनांक ११।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज झालेल्या प्रचार सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गोड बातमी दिली. वैद्यनाथ साखर कारखाना यंदा सुरू होणार असून येत्या गुरूवारी १४ तारखेला कारखान्यात रोलर पूजन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज अंबाजोगाई येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात आ.पंकजाताई मुंडे यांनी उपस्थितांना एक गोड बातमी देत असल्याचे सांगितले. आता तुम्ही ऊसाची चिंता करू नका. वैद्यनाथ कारखान्याचा डीआरटी मधून निर्णय झाला आहे. येत्या गुरूवारी १४ तारखेला वैद्यनाथ कारखान्याचे रोलर पूजन आहे. आणि २५ नोव्हेंबरला ऊसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम आहे. प्रभू वैद्यनाथ आणि लोकनेते मुंडे साहेबांच्या कृपेने हा कारखाना यंदा सुरू होत आहे. सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा कारखाना पुन्हा सुरू करत आहे, याचा मला आनंद होत आहे असं आ. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. आ. पंकजाताई मुंडेंच्या या गोड बातमीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.