मुंबई – ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुरुवारी सोसायटीची ३३३ कोटी ८२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सुरेश कुटे यांच्या कुटे डेअरी, कुटे सन्स फ्रेश डेअरी या कंपन्यांच्या जमिनी, इमारती, प्रकल्प आणि मशिनरीचा समावेश आहे. या मालमत्ता सातारा व अहमदनगर जिल्ह्यात आहेत.
यापूर्वी ईडीने १० ऑक्टोबर रोजी सोसायटीची १००२ कोटी ७९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये मुंबई, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना येथील काही इमारती आणि भूखंडांचा समवाेश होता. सप्टेंबर महिन्यात ईडीने सोसायटीची ८५ कोटी ८८ लाख रुपयांची अचल मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथील काही फ्लॅट, कार्यालयांची जागा आणि भूखंड आदींचा समावेश होता. आतापर्यंत सोसायटीची एकूण १०९७ कोटी ८७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ज्ञानराधा सोसायटीने १२ ते १४ टक्के व्याजदराने परतावा देणाऱ्या अनेक ठेव योजना सादर केल्या होत्या. तसेच, सोसायटीने सोने, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज अशा कर्ज योजनादेखील सादर केल्या होत्या. सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी या दोघांच्या नियंत्रणाखाली सोसायटीचे काम सुरू होते. त्यांनी राज्यभरातील किमान चार लाख गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आले. काही ठराविक गुंतवणूकदारांना सुरुवातीला त्यांनी परतावा दिला. मात्र, त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांना एक रुपया देखील परत मिळाला नाही.
पैसे काढून घेतली वैयक्तिक मालमत्ता
कुटे यांनी २३१८ कोटी रुपयांचा अपहार करत ते पैसे आपल्या अन्य कंपन्यांत कर्ज रूपाने वळविल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. हे पैसे नंतर रोखीने काढून घेत त्याद्वारे त्यांनी वैयक्तिक मालमत्तांची खरेदी केल्याचेही तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी सुरुवातीला राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. मात्र, या प्रकरणात मनी लॉंड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने देखील याचा तपास सुरू केला होता.