बीड

आता कोणीही कितीही आडकाठ्या आणल्या तरीही बीड विधानसभा निवडणूक लढवायचीच, डॉ. योगेश क्षीरसागरही उतरले निवडणुकीच्या मैदानात, उमेदवारी अर्ज केला दाखल

दि.२८ : गेली ३५ वर्ष माझ्या वडिलांनी बीड शहराची सेवा केली आहे. आपणही साधारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे आणि महायुतीचे विचार मतदारसंघात, प्रत्येक वॉर्डात, गल्ली, गाव, वस्तीवर पोहचवले. अनेक कामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. आपण दिवसभर जनतेच्या दरबारात राहिलोत. त्यामुळे आता कोणीही आणि कितीही आडकाठ्या आणल्या तरीही बीड विधानसभा निवडणूक लढवायचीच, असे स्पष्ट करत फॉर्म कुठला आहे, चिन्ह कोणतं आहे? याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही फक्त साथ द्या, जिंकण्याचं गणित डोक्यात आहे, असे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

महायुतीकडून बीडच्या जागेचा तिढा सुटलेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२८) बैठक घेतली. या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले होते. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, आता आपण उमेदवारी अर्ज भरत आहोत, मात्र हा अर्ज काढण्यासाठी नाही तर विधानसभेत जाण्यासाठी असेल. मला परिवारातील लोकांनी एकटे पाडले, तुम्ही एकटे पाडू नका असे भावनिक आवाहन डॉ.योगेश यांनी केले. तसेच, वडील आजारी आहेत, त्यांची उणीव भासतेय असे सांगताना डॉ.योगेश क्षीरसागर हे भावूक दिसले. बैठक संपताच ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले. दरम्यान, योगेशभैय्या आता नाही तर कधीच नाही, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायचीच असा निर्धार यावेळी केला.

चौकट
बैठक, रॅलीला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सकाळी लोकनेत्या स्व.केशरकाकू व नाना यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर बीडचे माजी नगराध्यक्ष आणि माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर व आई डॉ.दिपा क्षीरसागर यांचे आशीर्वाद घेतले. शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, सर्व बूथ, वॉर्ड, गावपातळीवर प्रभावी यंत्रणा आहे. त्यामुळेच बैठक, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चौकट
निवडणूक जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढायचीय!

मला ही निवडणूक जातीपातीच्या नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढायची आहे. मी आजपर्यंत राबविलेले स्वयंरोजगार शिबिर, रोजगार मेळावा, आरोग्य शिबिरे, दरदिवशी जनतेच्या कामांची सोडवणूक, अनेक सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम, कोट्यवधींची विकासकामे, अशा सर्व कामाच्या माध्यमातून २४ तास जनतेच्या दरबारात राहिलो. मला या जनसेवेची पावती मिळेल, असा विश्वास डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!