बीड(प्रतिनिधी) बीड विधानसभा क्षेत्रातील प्रस्थापित पुढार्यांनी कायम जनतेला केवळ विकासाच्या भुलथापाच दिल्या आहेत. विकासाचे कोणतेही व्हिजन त्यांच्याजवळ नाही. केवळ स्वत:चे पुढारपण टिकवण्यासाठी विकासाची नाटके करुन दाखणार्यांना हबाडा देण्यासाठी आपण विधानसभा निवडणूकीच्या मैदानात उतरलो असून जनता जनार्धन नक्कीच आपल्याला आशिर्वाद देईल असा विश्वास मराठासेवक तथा सरपंच, उपरसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला.सोमवार दि.28 रोजी श्री.खाडे यांनी बीड विधानसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
मराठा आरक्षण महायोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या साथीने व सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादाने आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्याचे सांगत कुंडलिक खांडे म्हणाले की, मी एक सर्वसामान्य घरातील युवक असून विकासाच्या माध्यमातून मतदार संघाचा कायापालट करु इच्छीतो आहे. आतापर्यंत प्रस्थापित पुढार्यांनी केवळ आपली घराणेशाही चालवत जनतेला विकासाच्या थापा मारलेल्या आहेत. केवळ समाजात समाजात भांडणे लावणे, जर कोणी विकासाचे, जनतेचे प्रश्न मांडत असेल तर त्याच्या विरुध्द कटकारस्थान करुन त्यांना जेलमध्ये डांबणे, गावागावात भांडणे लावणे आदि प्रकारच प्रस्थापितांनी केले आहेत. त्यांच्या या सर्व गोष्टी आपण जनतेसमोर मांडणार असून विकासाचे एक नवे व्हीजन घेवून आपण जनता जनता जनार्धनाचा आशिर्वाद मागत असल्याचे खांडे म्हणाले.