परळी वैद्यनाथ (दि. 26) – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अल्ट्राटेक कंपनीला दिलेल्या विश्वासामुळे कंपनीने त्यांच्या परळी येथील सिमेंट ग्रायडिंग युनिटच्या उत्पादन क्षमतेमध्ये पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याठिकाणी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीने दोन टप्प्यात करणार असल्याचे जाहीर केले आहे.
या उद्योगामुळे अल्ट्राटेक या जागतिक दर्जाच्या कंपनीचे अतिरिक्त युनिट परळीत उभा राहणार असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना रोजगार निर्मिती होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ परळी येथे धनंजय मुंडे यांच्या भेटीला आले होते, यावेळी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, कंपनीने क्षमता वाढीसाठी दि.24 रोजी संपन्न झालेली पर्यावरण जनसुनावणी पार पडल्यानंतर परळी येथील युनिट साठी दोन टप्प्यांत अतिरिक्त 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता दिली असल्याचे कंपनीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या आधी देखील धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळी वैजनाथ शहरालगत इंडिया सिमेंट कंपनीने सदरील युनिट सुरू केले होते. त्याद्वारे देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली आहे.
त्यानंतर आता जागतिक दर्जा प्राप्त असलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या या मोठ्या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात विविध इतर पूरक उद्योगांना चालना मिळणार असून स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. या गुंतवणुकीसाठी मान्यता दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी अल्ट्राटेक कंपनीच्या संचालक मंडळाचे आभार मानले आहेत.