बीड

राजेश देशमुख यांचा भाजपाला रामराम, भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा, शरद पवारांनी संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढविणार

परळी प्रतिनिधी. परळी तालुका व परिसरातील सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आणि सर्वसामान्यांची कामे होत नसल्याने आपण भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे राजेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संधी दिल्यास परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असल्याचेही ते म्हणाले.

राजेश देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमीच पंकजाताई मुंडे यांच्यासारख्या सक्षम ओबीसी नेत्यांना

डावलण्याचे काम केले आहे.त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचे कामे होत नव्हती. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या समवेत आपण प्रामाणिकपणे काम केले. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे तीन वेळा भेट घेतली. तसेच मतदारसंघातील सर्व माहिती त्यांना देण्यात आली. तसेच धनगर, मराठा, बहुजन समाजाला पवार साहेबांनी आता संधी द्यावी अशी ही विनंती करण्यात आली. माझा जन्मच पुरोगामी पक्षात झाला आहे. त्यामुळे परत एकदा मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळालो आहे.
परळी शहरात परिस्थिती कोणत्या दिशेने चाललेली आहे हे सर्वांना माहीत आहे. परळीत सर्वांना सुखाने नांदता आले पाहिजे हीच माफक अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यातून अनेक नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजपा, बीड जिल्ह्यात शिल्लक राहते की नाही हा प्रश्न आहे असेही राजेश देशमुख म्हणाले. भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवल्याचे ते म्हणाले.
दरम्यान राजेश देशमुख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र आता शरद पवार कोणाच्या गळ्यात उमेदवारी घालतात हे दोन दिवसात स्पष्ट होईल.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!