बीड -. एकीकडे सर्वच पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जातं असताना भाजपने मात्र दोन पिढ्यापासून पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख कुटुंबाला न्याय दिला आहे. भाजपचे सरचिटणीस शंकर देशमुख यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान शनिवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंकर देशमुख यांना त्यांच्या नव्या जबाबदारीचे पत्र दिले. शंकर देशमुख हे भाजपचे विद्यमान सरचिटणीस आहेत. माजीमंत्री पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून देशमुख यांची ओळख आहे.
कोण आहेत देशमुख………!
वडिलांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचा वारसा असणाऱ्या देशमुख कुटुंबातील शंकर देशमुख हे कारसेवक म्हणून बाबरी मस्जिद पतनाच्या वेळी आंदोलनात सक्रिय सहभागी होते.
घरात भाजपचा वारसा असल्याने पक्षनिष्ठ म्हणून त्यांनी अनेकवेळा वेगवेगळ्या पदावर जबाबदारी पार पाडली आहे.बूथ पासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पक्षाचं काम हिरीरीने करणारे म्हणून शंकर देशमुख यांची पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ओळख आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे यांच्यासोबत कौटुंबिक संबंध असलेल्या देशमुख यांना पक्षाने निष्ठेचे फळ दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होतं आहे.