बीड, विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरु असताना आपले कर्तव्य सोडून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या दोघांवर गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
अक्षय भागवत आणि अकबर पटेल अशी त्या दोघांची नावे आहेत.
राज्यात विधानसभा निवडणूक जाहिर झाली आहे. आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहिर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शासकीय विश्रामगृह सील केले आहेत. बीडचे विश्रामगृह देखील प्रशासनाने राजकीय व्यक्ती आणि इतर लोकांसाठी बंद केले आहे.
मंगळवारी रात्री बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक (avinash pathak )रेस्ट हाऊस वर भेटीसाठी गेले. तेव्हा त्या ठिकाणी इलेक्शन ऑबझरव्हर साठी आरक्षित असलेल्या खोल्यांमध्ये इतर लोक थांबल्याचे दिसून आले.
रेस्ट हाऊस वाऱ्यावर सोडून शाखा अभियंता अक्षय भागवत आणि मॅनेजर अकबर पटेल दोघेही गायब असल्याचे पाठक यांना दिसून आले. त्यामुळे त्यांचा पारा चढला. त्यांनी तातडीने उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना रेस्ट हाऊस वर बोलावून कान उघडणी केली.
संतापलेल्या जिल्हाधिकारी पाठक यांनी तातडीने संबंधित यंत्रनेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भागवत आणि पटेल या दोघांवर मंडळ अधिकारी बाबासाहेब तांदळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.