( बीड प्रतिनिधी )
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र मस्के यांनी आज संघर्षयोद्धा जनसंपर्क कार्यालय बीड येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने भारतीय जनता पार्टीला सोडचिट्ठी देऊन भाजप मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मा. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त करून, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी अथक परिश्रम घेऊन प्रामाणिकपणे निभावली. पक्ष विचार, पक्षाचे कार्यक्रम सामान्य जनतेपर्यंत पोहचून पक्ष विस्तारासाठी तन मन धनाने काम केले.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्या पर्यंत पक्षाचा कार्यक्रम व पक्षाचे नाव पोहोच केले. परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने कामाची दखल घेतली नाही. उलट दुजाभाव करत विरोधकावर मर्जी दाखवून कोठ्यावधीचा निधी देऊन, त्यांना बळ देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. राजकीय आणि विकास कामातही भाजपा पदाधिकाऱ्यांची दखल सत्ता असताना देखील घेतली गेली नाही.
लोकसभा निवडणुकीत लोकनेत्या पंकजाताई यांच्या विजयासाठी प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत यंत्रणा उभी केली. विजयासाठी कष्ठ घेतले. दुर्दैवाने पराभवानंतर व्यक्त केलेली शंका मनाला वेदना देणारी आहे. पराभवाचे खापर एकट्या मराठा समाजावर फोडून मोकळे झाले. मागील वर्षी बैलगाडा शर्यती दरम्यान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या साक्षीने पंकजाताईंनी विधानसभेची उमेदवारी देण्याचे संकेत दिले. परंतु आज विधानसभा रणधुमाळी चालू असताना पक्षाने विचारपूस केली नाही. यावरून स्पष्ट येते की, भारतीय जनता पार्टीला राजकीय नकाशावर बीड जिल्ह्याची गरज उरलेली नाही. सर्व बळ आणि ताकत विरोधकांना देण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाने घेतला आहे. जिह्यातील पक्ष हितासाठी प्राधान्य दिले गेले नाही. अशा नेतृत्वात काम करणे दुरापस्त आहे. म्हणून आज जिल्हाध्यक्ष पदासह भारतीय जनता पार्टीचा त्याग करत आहे. आगामी दोन तीन दिवसात योग्य तो राजकीय निर्णय घेतला जाईल, राजेंद्र मस्के यांनी म्हंटले आहे.