बीड

शरद पवारांच्या भेटीनंतर आ. सतिश चव्हाण सहा वर्षासाठी निलंबित,अजित पवार यांच्या पक्षाची कारवाई


आ. सतिश चव्हाणही महायुतीमधून
पडले बाहेर, शरद पवारांना भेटल्यामुळे
पक्षाने केली निलंबनाची कारवाई


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : विधान सभा निवडणूकीच्या तोंडावर शरद पवारांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीला चांगलाच सुरूंग लावला आहे. कारण त्यांच्या गटातून एक एक दिग्गज नेता बाहेर पडत आहे. त्यानुसार आता मराठवाडा पदविधर मतदार संघाचे आ. सतिश चव्हाण हेही महायुतीमधून बाहेर पडले आहेत. त्यांनी शुक्रवारी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती, ते शरद पवार यांच्या गटाकडून गंगापुर विधानसभा लढविणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. त्यामुळेच आता त्यांच्यावर अजित दादांच्या पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.


येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणूकीसाठी मतदान पार पडणार आहे. याच अनुषंगाने शरद पवारांनी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदें सेनेला सुरूंग लावला आहे. मराठवाड्यात प्रबळ असणारे आ. सतिश चव्हाणही शरद पवारांच्या संपर्कात होते, त्याअनुषंगानेच त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेटही घेतली आहे. ते गंगापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळेच ते अजित दादांच्या राष्ट्रवादीबरोबरच महायुतीमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळेच आता त्यांचे सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. पक्षविरोधी आणि सरकारविरोधी भुमिका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आ. सतीश चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार आहेत. ते शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले होते. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. ते मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्षही आहेत. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाचा संपूर्ण मराठवाड्यात मोठा दबदबा आहे. आ. सतिश चव्हाण यांच्यामुळे शरद पवारांच्या गटाला मोठा फायदाच होणार आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक भुमिकेकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागलेले आहे. आणखी काय काय घडामोडी घडतात. याकडेही सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!