बीड/पाटोदा, दि. 4 (लोकाशा न्यूज) : भगवान बाबांची जन्मभुमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगावात संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेला पंकजाताई मुंडे यांचा बहूचर्चित दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दरवर्षी हा मेळावा यशस्वीपणे आणि मोठ्या उत्साहात पार पडत आहे, या निमीत्ताने या ठिकाणी पंकजाताई मुंडें यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपुर्ण राज्यातुन अतिविराट जनसागर लोटत आहे, हा दसरा मेळावा आता प्रत्येक वर्षी याच ठिकाणी होत असुन यंदाही अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या दसरा मेळाव्याचे काम गतीने सुरू आहे. त्यानुसार येत्या दसर्या दिवशी सावरगावत भक्ती अन् शक्तीचा जागर पहायला मिळणार आहे. यंदाचा हा मेळावाही ऐतिहासिक होणार असून या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने मुंडे भक्त उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या मेळाव्याची चर्चा सध्या सोशल मीडीयावर जोरदार होत असून तसा टीझरही सर्वत्र पहावयास मिळत आहे.
अगदी दुर्लक्षित असलेला सावरगाव घाटचा परीसर दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने अचानक प्रकाशझोतात आला, संपुर्ण राज्याचे लक्ष सावरगांवकडे आले, पाटोद्यापासुन 27 कि.मी. असलेले सावरगांव घाट हा परीसर काहीसा विकासापासुन वंचित असा होता, प्रत्यक्ष भगवान बाबांची जन्मभुमी असुनही या ठिकाणाला भगवानगडाप्रमाणे प्रसिद्धि व ग्लॅमर नव्हते, मात्र हा सगळा परिसरात राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी प्रकाशझोतात आणला आहे. या ठिकाणी प्रत्येक वर्षी हा दसरा मेळावा होत असल्याने या परीसराचा कायापालट सुरु असुन त्या ठिकाणाचा तीर्थक्षेत्राप्रमाणे विकास अत्यंत वेगात सुरु आहे.भगवान गडाचा कायापालट करण्यात स्व. गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान होते, आता बदलत्या काळात पुन्हा एकदा तशीच परीस्थिती निर्माण झाली असुन आता सर्व सुत्रे ही पंकजाताई मुंडेंकडे असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक विजय गोल्हार, संतोष राख व गावकरी सहकारी रात्र दिवस हे काम पाहत असुन मुंडे भक्त यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाजसेवक विजय गोल्हार यांनी केले आहे. सावरगावातील पहील्या दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांनी आता आमचे भगवानबाबा सावरगावातच आहेत असे सुचक वक्तव्य केले होते.तसेच या ठिकाणी भव्य अशी पाण्यावर तरंगती बाबांची मुर्ती स्मारक उभारण्याची घोषणा केली होती, त्याचप्रमाणे आता ही सर्व कामे प्रत्यक्षात पुर्ण झाली असुन या ठिकाणी असलेल्या जन्मस्थळाच्या वाड्याचा जीर्णोद्धार तसेच गावांतर्गत रस्ते, पाणी या मुलभुत सुविधांसह, या परीसरातील लोकांना हॉटेल, प्रसाद साहीत्याचे दूकान आदींच्या माध्यमातुन रोजगार मिळण्याबरोबरच दळण वळणाच्या सुविधा देखील वाढत आहेत. या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातुन मुंडे समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्या पाश्वभुमीवर यंदा होणारी गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी एन टी चेंबर बेरिकेटर्स व मूर्तीचे रंगकाम चालू आहे तसेच आवश्यक त्या सर्व बाबींचे नियोजन केले जात आहे. वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी ही या ठिकाणी भेटी घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असुन या वेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मुळे सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
पुन्हा ताईंचा मेळावा राज्याचे लक्ष वेधणार
सावरगावातील पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा आणि या मेळाव्यानिमित्त माजी खा. प्रीतमताई मुंडे यांनी काढलेल्या भव्य दिव्य रॅलीने नेहमीच राज्याचे लक्ष वेधलेले आहे. या वर्षीही अगदी त्याच पध्दतीने या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. या वेळी राज्यातील व पर राज्यातील भाविक भक्त व मुंडे भक्त येणार असुन त्या गर्दीची परिस्थिती लक्षात घेता पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या भगवान बाबांच्या मूर्ती समोर मैदानामध्ये मध्ये बॅरिकेटर्स बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे .तसेंच संत भगवान बाबा यांच्या मूर्तीला कलर देण्याचे काम सुद्धा चालू आहे तसेच इतरत्र कामे सावरगाव ग्रामस्थ यांच्या मदतीने चालू आहेत, अशी माहिती समाजसेवक विजय गोल्हार व सामाजिक कार्यकर्ते संतोष राख यांनी दिली आहे.