एसपींचा दणका, बनावट नोटा विक्रीचा
डाव बीड शहर पोलिसांनी हाणून पाडला
पुण्यात मोठी कारवाई, प्रविण गायकवाड गजाआड,
साडे आठ हजार रूपये किंमत असणार्या
बनावट नोटांसह गावठी पिस्टल जप्त
बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांना सरळ करण्यासाठी आणि त्यांना कायद्याचा धाक दाखविण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतलेली आहे. या मोहिमेतच त्यांच्या हाती बनावट नोटा तयार करणारे मोठे रॅकेट लागले आहे. बीडमध्ये बनावट नोटा तयार करून त्या पुण्यात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या रकमेत घुसवण्याचा मोठा प्लॅन होता. हाच डाव पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात बीड शहर पोलिसांनी हाणून पाडला आहे. बीड शहर पोलिसांनी पुण्यात आरोपी प्रविण गायकवाड गजाआड करून साडे आठ हजार रूपये किंमत असणार्या बनावट नोटांसह एक गावठी पिस्टल जप्त केली आहे. बीड शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणून गेले आहेत.
आठवडाभरापूर्वी बनावट नोटांचा गुन्हा बीड शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असून त्याच्यामध्ये एक आरोपी अटक आहे आणि नवीन आणखी पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यातील फरार आरोपींचा शोध चालू असून यातील मुख्य सूत्रधार मनीस क्षीरसागर हा गुन्हा दाखल झाल्यापासून बनावट नोटांच्या साहित्यासह फरार आहे. यातील तपासातून पुढे आलेली माहिती अशी की, बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार मनिष क्षीरसागर हा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणणार होता. या कामी त्याला त्याचा मित्र प्रवीण गायकवाड (रा. भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड, हल्ली मुक्काम आंबेगाव पुणे) हा मदत करत होता. यासाठी प्रवीण गायकवाडला मनीष क्षीरसागरने बनावट नोटांची नमुने आणि एक पिस्टल सुद्धा पाठवले होते आणि दोन लाखात चार लाख रुपये देण्याचे ठरले होते, अशा प्रकारची डील झाली होती. तसेच सदरील रक्कम ही किंवा बनावट पैसे हे सिंहगड कॉलेजला यातील आरोपी प्रवीण गायकवाड हा विद्यार्थ्यांचा प्रवेश देण्यासाठी जी रक्कम द्यावी लागते त्या रकमेत घुसवणार होता. यामध्ये प्रवीण गायकवाडला मदत करणारे पुणे येथील लोक असण्याची शक्यता आहे. याचाही तपास चालू आहे. हे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पुणे येथे प्रवीण गायकवाडला अटक करण्यासाठी एका टीमला पाठवण्यात आले. टीमने प्रवीण गायकवाड याला साडे आठ हजार रूपये किंमतीच्या बनावट नोटांसह आणि एक गावठी पिस्टल अशा प्रकारचे हत्यार त्याचे राहते घर आंबेगाव इथून जप्त केले आहे. तसेच यातील आरोपी प्रविण गायकवाड आणि आकाश जाधव या दोघांचेही दिनांक चोवीस सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळालेला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विश्वंभर गोलडे, शितलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक बीड शहर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड, बाळासाहेब सिरसाठ, मनोज परजणे, अशपाक सय्यद, जयसिंह वायकर या अंमलदार यांनी केली आहे.
दोन लाखाचे चार लाख
करण्याचे आखले होते नियोजन
बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार मनिष क्षीरसागर हा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणणार होता. या कामी त्याला त्याचा मित्र प्रवीण गायकवाड हा मदत करत होता. यासाठी प्रवीण गायकवाडला मनीष क्षीरसागरने बनावट नोटांची नमुने आणि एक पिस्टल सुद्धा पाठवले होते आणि दोन लाखात चार लाख रुपये देण्याचे ठरले होते, अशा प्रकारची डील झाली होती.
बनावट नोटांचे कनेक्शन
पुण्याच्या सिंहगड कॉलेजपर्यंत
सदरील रक्कम किंवा बनावट नोटा सिंहगड कॉलेजला यातील आरोपी प्रवीण गायकवाड हा विद्यार्थ्यांचा प्रवेश देण्यासाठी जी रक्कम द्यावी लागते त्या रकमेत घुसवणार होता. यामध्ये प्रवीण गायकवाडला मदत करणारे पुणे येथील लोक असण्याची दाट शक्यता आहे. याचाही बीड शहर पोलिस कसून तपास करत आहे.