बीड दि.१६ (प्रतिनिधी)-अवैध धंद्यांचे माहेरघर ठरू लागल्या बीड जिल्ह्यात अविनाश बारगळ यांनी एसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर महिनाभरात कारवायांचा आलेख चांगलाच वाढला आहे.विशेष म्हणजे दि.१४ व दि.१५ रोजी बीड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अवैध दारू आणि जुगाऱ्यांवर मोठी कारवाई करत तब्बल ११६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.८४ ठिकाणी छापे मारत पोलिसांनी या कारवाया केल्या.
अविनाश बारगळ यांनी बीडच्या पोलीस अधिक्षक पदाची जबाबदारी घेतल्यापासून अवैध धंद्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.वाळू माफियांसोबतच अवैध दारू,गुटखा आणि आता जुगार अड्ड्यावर कठोर कारवायांचा सूचना एसपींनी ठाणेदारांना दिल्या होत्या.त्यानुसार दि.१४ व दि.१५ रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील प्रभारींनी दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा मारून रेकॉर्डब्रेक कारवाया केल्या आहेत. गावठी दारूच्या ७४ अड्ड्यांवर छापा मारून ६ लाख ५१ हजार ५६५ किंमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याशिवाय १० जुगार अड्ड्यांवर छापा मारून ५ लाख ९८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या दोन्ही कारवाईत ११६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवायांमुळे मात्र अवैध धंद्यावाल्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.