बीड, दि.1 (प्रतिनिधी)ः- बीड शहरासह जिल्हाभरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. रवीवारी सकाळपासून पावसाने जिल्हाभर सर्वदुर हजेरी लावली असुन नदी, नाले वाहू लागले आहेत. बीड शहरापासून जवळच असलेल्या बिंदुसरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. संततधार कायम सुरू असल्याने नदीला पूर येण्याची दाट शक्यता नाकारली जावून शकत नाही यामुळे बीड नगर पालिका मुख्याधिकारी निता अंधारे यांच्याकडून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 566.1 मिमी असुन आत्तापर्यंत 563.6 मिमी पावसाची नोंद झाली असुन जुन ते 1 सप्टेंबरपर्यंत 99.6 टक्के पाऊस झाला आहे. जिल्हा वार्षिक सरासरी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर असुन शनिवारी रात्रीपासून ते रविवारीपर्यंत 3.5 मिलीमिटर पाऊस झाला आहे. दरम्यान बिंदुसरा प्रकल्प पुर्णपणे भरले असुन ओसंडून वाहू लागला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास बिंदुसरा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिंदुसरा नदीकाठी राहणार्या नागरीकांना नगर पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुर नियंत्रण रेषेत राहणार्या नागरीकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, कुठल्याही प्रकारची जीवीत व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे आणि बीड तहसीलदारांनी केले आहे. नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबतची अनाऊंसमेंट शहरातील प्रत्येक भागात नगर पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.