बीड : राज्यभरात सुरु असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जन सन्मान यात्रा बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी आली होती. या यात्रेची संपूर्ण जबाबदारी पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या खांद्यावर होती. त्यांनी एकट्याने ताकदीने ही यात्रा यशस्वी केली. या यात्रेत पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शन अन् खंबीर पाठबळ डॉ.योगेश यांना मिळाल्याचे दिसून आले. यात्रा यशस्वी केल्याबद्दल अजितदादांनी योगेशभैय्यांवर कौतुकाची थाप टाकली.
जन सन्मान यात्रा बीडमध्ये येणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर ना.धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सुचनेनुसार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. दौर्याचे पूर्ण नियोजन करण्यासह नियोजनासाठी त्यांना अवघ्या तीन दिवसांचा अवधी मिळाला. अत्यल्प वेळेत त्यांनी यात्रेतील बाईक रॅली, प्रचंड गर्दीची सभा यशस्वी करून दाखविली. या सभेत क्षीरसागरांचा जनसागर दिसून आला. सभेनंतर बीडमधील सौ.के.एस.के. महाविद्यालयास अजितदादांसह ना.धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी अजितदादांनी योगेशभैय्यांवर कौतुकाची थाप दिली. तसेच, त्यांचा सन्मान स्वीकारून आष्टीकडे जन सन्मान यात्रेसाठी मार्गस्थ झाले. या दौर्याने अजितदादांच्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
शिवसेना, भाजपच्या पदाधिकार्यांना मान
जन सन्मान यात्रेत महायुतीतील घटकपक्षांचे पदाधिकारी, सहकार्यांशी अजितदादांनी थेट संवाद साधला. व्यासपीठावर शिवसेनेचा सत्कार स्वीकारला. त्यानंतर सौ.के.एस.के. महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसह भाजप, शिवसेनेचे काही पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी बंद दाराआड आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. दरम्यान, संपूर्ण नियोजनात डॉ.क्षीरसागरांचा वरचष्मा दिसला, परंतु काही पदाधिकारी गैरहजर राहिल्याची दखल पक्षश्रेष्ठींकडून घेतली गेल्याचे समजते.
स्टार्ट टू एन्ड डॉ.योगेशभैय्याच सोबत!
पोलीस मुख्यालयावर आगमनानंतर स्वागतासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत योगेशभैय्या दिसले. त्याठिकाणी पक्षातील अनेक पदाधिकार्यांनी सत्कार केला. परंतु, बाईक रॅली सुरु होताच अजितदादांच्या गाडीवर दादासमवेत प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि योगेशभैय्याच सोबत दिसले. रॅलीच्या मार्गात काही ठिकाणी योगेशभैय्यांनी गाडी थांबवून स्थानिक व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, नेत्यांच्या भेटी घालून दिल्या. व्यासपीठाकडे आल्यानंतर अजितदादा, धनंजय मुंडे यांच्या दोघांच्याच भाषणात प्रास्ताविक डॉ.योगेशभैय्यांचेच होते. संपूर्ण दौर्यात स्टार्ट टू एन्ड योगेशभैय्याच सोबत असल्याने अजितदादांसह धनुभाऊंकडून त्यांना पाठबळ दिल्याचे स्पष्ट होते.