बीड

बिंदुसरेनंतर हा प्रकल्प झाला फुल्ल, या शहराचा पाणीप्रश्‍न मिटला


पाटोदा, दि.16 (लोकाशा न्युज) ः बीड शहराला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर असतांना पाटोदा शहराची तहान भागविणारे महासांगवी हा तलाव फुल्ल झाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी प्रश्‍न मिटला आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा पावसाळ्याच्या जून-जुलै या दोन महिन्यातच झालेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांशी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान झाले असून तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे. पाटोदा शहराला पाणीपुरवठा करणारा महासांगवी तलाव जुलैच्या शेवटच्या आठवडयात भरून वाहू लागला आहे तर राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला सौतड्याचा धबधबा सुरू होण्यासाठी पर्यटक जो तलाव भरण्याची वाट पाहतात तो रामेश्वर साठवण तलावही 5 ऑगस्ट रोजी भरून वाहू लागल्याने हा प्रसिद्ध धबधबा सुरू झाला आहे. डोंगराळ भूभाग असलेल्या पाटोदा तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान 601 किलोमीटर असताना यंदा जून व जुलै या दोन महिन्यात पाटोदा तालुक्यात 399 मिलिमीटर म्हणजे जवळपास चारशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली त्यामुळे तालुक्यातील अनेक तलाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भरून वाहू लागले यामध्ये कुसळब, मुगगाव, बांगरवाडी, लांबरवाडी, मंगेवाडी, पिंपळवंडी यासह लहान-मोठे तलाव भरून वाहू लागले पाटोदा शहराला पाणीपुरवठा करणारा महासांगवी सिंचन प्रकल्प 24 जुलै रोजी भरून वाहू लागल्याने मांजरा नदी सध्या वाहत आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षण असलेला विंचरणा नदीवरील सौताडा येथील प्रसिद्ध धबधबा हा सौताडा येथील रामेश्वर साठवन तलावावर अवलंबून आहे. कारण रामेश्वर साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहण्यासाठी विंचरणा नदीवरील मुगगाव वसंतवाडी लांबरवाडी भुरेवाडी हे तलाव पूर्ण क्षमतेने भरावे लागतात. हे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सौताडा येथील रामेश्वर साठवण तलाव भरतो व त्यानंतर या भागात होणार्‍या पावसाने प्रसिद्ध असलेला हा धबधबा मोठ्या प्रमाणात सुरू होतो.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!