बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : बीड, नगर आणि जालना या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे पहायला मिळत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून चोर्या केल्या जात असल्याची अफवा पसरविली जात आहे. यातून मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. याच सर्व घडामोडीची तात्काळ दखल घेवून पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ड्रोनच्या कंपन्यांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, अफवा पसरू नये, त्या ड्रोनपासून कुणालाही धोका नाहे, असे दै. लोकाशाशी बोलताना एसपींनी स्पष्ट केले आहे.
आज बर्याच ठिकाणी ड्रोन फिरत आहेत, मात्र या ड्रोनपासून कुणालाही धोका नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, या ड्रोनसंदर्भात आम्ही कंपन्यांशी संपर्क करून त्याचे वर्णन कळविलेले आहे. विशेष म्हणजे या ड्रोनमुळे कुठेही चोरीच्या घटना घडलेल्या नाहीत, किंेवा त्या ड्रोनमधून कशाचा मारा किंेवा शुटींगही केली जात नाही, असे असतानाही केवळ अफवा पसरून नागरिकांना मारहाण केली जात आहे. असे कुणीही करू नये, हे ड्रोन का फिरत आहेत, याचा सखोल तपास बीड पोलिस करत आहे. त्यामुळे विनाकारण अफवा पसरून कोणालाही मारहाण करू नये, असे आवाहन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे.