बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : आपल्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात बीड जिल्ह्याच्या विकासाला प्रचंड प्रमाणात गती देणार्या माजी खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अभूतपुर्व निधी दिल्याबद्दल यावेळी प्रीतमताई मुंडे यांनी ना. गडकरींचे आभार मानले आहेत.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा सक्षमपणे वारसा चालविण्याचे काम आज लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे आणि डॉ. प्रीतमताई मुंडे ह्या करीत आहेत. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या दहा वर्षाच्या काळात बीड जिल्ह्याला विकासात पुढे घेवून जाण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे, बीड जिल्ह्यासाठी महत्वाचा असणारा नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा प्रश्न डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यामुळेच खर्या अर्थाने मार्गी लागला, त्यांच्याच प्रयत्नामुळे आज हा रेल्वे मार्ग परळीपर्यंत गतीने पोहचत आहे. तसेच महामार्गाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण बीड जिल्हा देशाला जोडण्याचे काम केलेले आहे. त्यांना याकामी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पावलोपावली मोठी मदत झालेली आहे. याच अनुषंगाने बुधवारी डॉ. मुंडेंनी नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी भेट घेतली. माझ्या दहा वर्षांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील रस्ते, महामार्ग आणि वाहतूकी विषयीचे प्रश्न जेंव्हा जेंव्हा आदरणीय गडकरी साहेबांकडे मांडले तेंव्हा वेळोवेळी त्यांनी सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावले. तसेच मागील दहा वर्षांच्या काळात आपल्या जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व निधी त्यांनी उपलब्ध करून दिला होता. आपल्या प्रत्येक मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल गडकरी साहेबांचे आभार मानले. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधून नेहमीप्रमाणे सकारात्मक ऊर्जा मिळाली, अशी प्रतिक्रीया डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
ना. रक्षा खडसेंचीही घेतली भेट
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी युवा व्यवहार व क्रिडा राज्यमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयास माजी. खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी डॉ. मुंडेंनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सौ. वेदांतिका धैर्यशील माने या देखील माझ्यासोबत होत्या.