अंबाजोगाई, दि. 9 (लोकाशा न्यूज) : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नवीन सीटी स्कॅन मशीन करण्यासाठी राज्य शासनाने 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मागील आठ महिन्यापासून रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेत केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आग्रही पाठपुरावा केल्यानंतर शासनाने मंगळवारी (दि.09) निधी मंजुरीचे आदेश काढले.
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात अत्यल्प दरात अद्यावत यंत्रसामुग्रीद्वारे तपासणी करून उपचार होत असल्याने येथे रुग्णांची दररोज प्रचंड गर्दी असते. परंतु येथील सिटी स्कॅन मशीन मागील आठ महिन्यापासून बंद पडली होती. आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर अनेक अडचणींवर मात करत मागील महिन्यात हि मशीन तात्पुरत्या अवस्थेत पुन्हा सुरु करण्यात यश मिळाले होते. त्यामुळे अति अत्यावस्थ रुग्णांची गैरसोय काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र कालबाह्य झालेली सध्याची मशीन कितपत चालेल याबाबत शंका असल्याने आ. नमिता मुंदडा यांनी नवीन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे नवीन सीटी स्कॅन मशीनसाठी युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु केला होता. अखेर आ. मुंदडा यांचे प्रयत्न फलदायी ठरले असून राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने राज्य योजनेंतर्गत मंजूर अनुदानातून स्वाराती रुग्णालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीन खरेदीसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. लवकरच निविदा प्रक्रिया पार पाडून नवीन मशीन येणार असल्याने रुग्णांना त्याचा प्रचंड लाभ होणार आहे. यानिमित्ताने सिटी स्कॅन मशीनसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, लोकनेत्या पंकजाताई मुंडे, माजी खा. प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी आभार मानले आहेत.