मुंबई (दि. 02) – केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत 70 लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये 20 लाख 50 हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
पी एम किसान योजनेत राज्यातील 65 हजार शेतकरी काही कागदपत्रांच्या किंवा ई केवायसीच्या कारणावरून वंचित राहिल्या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांसह विविध सदस्यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत संबंधित 65 हजार शेतकऱ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर केलेला असून या प्रस्तावास शक्य तितक्या लवकर मान्यता मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
दरम्यान या योजनेमध्ये आणखी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची वाढ व्हावी याबाबत राज्यस्तरावरून तसेच केंद्र स्तरावरून विविध मोहिमा वेळोवेळी राबविण्यात येतील, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच डेटा एन्ट्री करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार असल्याचीही घोषणा धनंजय मुंडे यांनी यावेळी विधानसभेत बोलताना केली.
आ.अभिमन्यू पवार यांसह आ.प्रकाश आबिटकर, आ. बच्चू कडू, आ.श्वेताताई महाले यांसह आदी सदस्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले.