बीड

राज्यात खत, बी-बियाण्यांचा कुठेही तुटवडा भासू देणार नाही, शासन स्तरावर टास्क फोर्स नेमून सुयोग्य नियोजन केले जात आहे – धनंजय मुंडे, खते व बी-बियाण्यांची कृत्रिम टंचाई जाणीवपूर्वक, कृत्रिम टंचाईसहचढ्या भावाने विक्री व लिंकिंगवर कृषी विभागाची करडी नजर – धनंजय मुंडे

बीड (दि. 14) – महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने बी-बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा शासन व बाजार स्तरावर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यात कुठेही तुटवडा भासू देणार नाही, याबाबत शासन स्तरावर टास्क फोर्स नेमून सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे; अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

राज्यात बोगस बियाणे, लिंकिंग, खत-बियांची चढ्या भावाने विक्री या विरोधातील 5 कृषी कायदे प्रस्तावित केल्यानंतर काही ठराविक घटकांकडून राज्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई भासवली जात आहे. हा संपूर्ण प्रकार जाणीवपूर्वक केला जात असून, खतांची व बियांची कृत्रिम टंचाई भासवणे किंवा त्याआडून चढ्या भावाने विक्री करणे याबाबत धडक कारवाया करणे सुरू असल्याचेही धनंजय मुंडे याप्रसंगी बोलताना म्हणाले.

यावेळी धनंजय मुंडे यांनी राज्यभरात स्थानिक पथकांकडून करण्यात आलेल्या कारवायांची आकडेवारीच पत्रकारांसमोर मांडली.

दरम्यान राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार हेल्पलाईन साठी तक्रारी देण्यासाठी थेट व्हाट्सप क्रमांक (9822664455) हा उपलब्ध करून देण्यात आला असून, यावर आतापर्यंत यावर 153 तक्रारी आल्या आहेत. तर त्यापैकी वैध 75 तक्रारींविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्ह्यात महावितरण कडील प्रलंबित कामे, पावसाळ्याचे नियोजन, विविध योजना आदींच्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आ.प्रकाशदादा सोळंके, आ.बाळासाहेब काका आजबे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री भुमे यांसह महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झाला. याविषयी धनंजय मुंडे यांनी आज पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाष्य केले.

अत्यंत वेगळ्या परिस्थितीत विकास बाजूला ठेवून इतर मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली. त्यात अत्यल्प मतांनी आमचा पराभव झाला, तो आम्ही मान्य केला तसेच पराभवाची जबाबदारी देखील एका अर्थाने मी घेतली आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

निवडणुकीत जय-पराजय होत असतात. पुढेही अनेक संधी येतील. मात्र निवडणुकीत पराभव झाला म्हणून विवंचना व नैराश्यातून काही कार्यकर्त्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. हे आमच्या मनाला अत्यंत वेदना देणारे व आमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करणारे आहे. ही काही शेवटची निवडणूक नाही, पण जीवन किंवा कुटुंब मात्र पुन्हा मिळत नाही, त्यामुळे या विवंचनेतून बाहेर पडून पुढील लढाई साठी सज्ज होऊ, असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी समर्थक कार्यकर्यांना केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!