बीड

अखेर राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्हचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह १७ आरोपींवर गुन्हा दाखल ;फसवणूक केल्याच्या आरोपावरून परळी शहर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल

परळी वैजनाथ दि २४ (लोकाशा न्युज) :-
ठेवीदारांच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर आज पहाटे २.४७ वाजता राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह १७ संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यां विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मल्टीस्टेटचे परळी मुख्यालय असताना देखील गुन्हा होत नसल्याने तमाम ठेवीदारात संताप व्यक्त होत होता. उशिरा का असेना पोलिसांना जाग आली अन् भल्या पहाटे परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेली अनेक महिन्यांपासून राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह अख्ख संचालक मंडळ ठेवीदारांचे जवळपास ३०० कोटी बुडवत परळीतील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करून पोबारा केल्याची संताप जनक घटना घडली. यामध्ये ज्या ठेवीदारांनी चंदुलाल बियाणी आणि संचालक मंडळावर मोठा विश्वास ठेवून भविष्यात आपल्या दवाखाना, लग्न समारंभ, मुलांचे शिक्षण, व्यवसाय, शेती आदीसाठी पैसा कामी येईल आणि महिन्यांचा खर्च व्याजाच्या स्वरूपात उचलून आपला उदरनिर्वाह भागवावा ह्या उद्देशाने लाखो रुपयांच्या ठेवी राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह मध्ये ठेवल्या. मात्र आपला अव्वाच्या सव्वा खर्च ठेवीदारांच्या पैशातून केल्यामुळे राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह डबघाईला आली परिणामी ठेवीदारांचे पैसे बुडण्यात जमा झाले. आपला मेहनतीचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यामुळे तमाम ठेवीदारांमध्ये मोठ्या संतापाची लाट उसळली आणि आपल्या पैशांच्या मागणीसाठी राजस्थानी मल्टीस्टेटच्या शाखेत चकरा खेटा मारण्यास प्रारंभ केला तरी देखील चंदुलाल बायाणी यांच्यासह अख्ख्या संचालक मंडळ ठेवीदारांचे पैशे देण्यासाठी असमर्थ ठरलं नंतर मात्र मुख्य शाखेसह सर्व शाखांना कुलूप लावीत सर्वचजण फरार झाले. ठेवीदारांनी चंदुलाल बियाणी यांच्यासह मल्टीस्टेटचे इतर संचालक अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच महिन्यांपासून ते फोन उचलत नसून नॉट रिचेबल आहेत परिणामी दिवसेंदिवस ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळत गेली. परिणामी आज पहाटे २.४७ वाजता बिभीषण मानाजी तिडके राहणार नेहरू चौक यांच्या फिर्यादीवरून ७,५३,२९,९६८/- रकमेसाठी परळी शहर पोलीस ठाण्यात गु र नंबर ७४/२०२४ दिनांक २४/५/२०२४ रोजी कलम ४०६, ४०९, ४२०, १२० बी, सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ कलम ३ नुसार चंदुलाल बियाणी यांच्यासह बालचंद्र लोढा, अभिषेक बियाणी, बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय लड्डा, अशोक जाजू, सतीश सारडा, प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेव रोडे, जगदीश बियाणी, व्ही बी कुलकर्णी, कांबळे मॅडम, तुषार गायकवाड, प्रदीप मुरकुटे, राजेश मोदानी व इतर सोसायटीचे अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला.
ठेवीदारांच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल झाला मात्र प्रत्यक्षात पोलीस आरोपीवर कधी कठोर कारवाई करतात याकडे ठेवीदारांचे लक्ष लागून आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!