बीड, दि.16 (लोकाशा न्यूज) : जिजाऊ मल्टिस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले. याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार जाधवर आणि खासगी इसमाविरोधात बुधवारी गुन्हा दाखल झाला होता. ही कारवाई होताच पो.नि. खाडे आणि जाधवरांनी बीडमधून धुम ठोकलेली आहे. तर झालेल्या याच कारवाईची तात्काळ दखल घेवून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्या दोघांनाही सेवेतून तडकाफडकी निलंबीत केले आहे. त्याचप्रमाणे कारवाईच्या दुसर्या दिवशी एसीबीच्या झाडाझडतीत दोन्ही लाचखोरांच्या घरातून मोठे घबाड सापडले आहे. यापैकी एकट्या खाडेंच्या घरातून एक कोटी आठ लाखांची कॅश, 970 ग्रॅम सोन्याचे दागिणे, पाच किलो चांदी, सहा ठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तर जाधवरांच्या घरातून 22 तोळे सोन्याचे दागिणे आणि आठरा हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे आणि त्यांच्या पथकाकडून सुरू असलेल्या याच कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील सर्वच लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
लाचखोर पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहायक फौजदार आर.बी.जाधवर हे दोघेही बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी तब्बल 1 कोटी रूपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती 30 लाख घेण्याचे ठरले होते, यासाठी सहाय्यक फौजदार जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला बुधवारी बीडमध्ये बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. ही कारवाई होताच लाचखोर खाडे आणि जाधवर या दोघांनीही बीडमधून धुम ठोकलेली आहे, ते अद्याही फरार आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. या कारवाईची तात्काळ दखल घेवून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी त्या दोन्हीही लाचखोरांना सेवेतून तडकाफडकी निलंबीत केले आहे. तर बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे आणि त्यांचे पथक लाचखोर खाडे आणि जाधवरच्या पाठीमागे हाथ धुवून लागले आहेत. त्यानुसार गुरूवारी एसीबीने खाडे यांच्या चाणक्यपुरी येथील किरायच्या घराची झाडाझडती घेतली, यावेळी एकट्या खाडेंच्या या घरातून एक कोटी आठ लाखांची नगदी रोकड, 970 ग्रॅम सोन्याचे दागिणे, पाच किलो चांदी, सहा ठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तर जाधवरांच्या घरातून तब्बल 22 तोळे सोन्याचे दागिणे आणि आठरा हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे आणि त्यांच्या पथकाकडून सुरू असलेल्या याच कारवयांमुळे बीड जिल्ह्यातील सर्वच लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
जाधवरांच्या घरात मिळाले
22 तोळे सोन्याचे दागिणे
बीड एसीबीचे डीवायएसपी शंकर शिंदे यांनी लाचखोर सहायक फौजदार जाधवर यांच्या घराचीही झाडाझडती घेतली, त्यांच्या घरात तब्बल 22 तोळे सोने आणि रोख 18 हजार रूपये एवढी रक्कम मिळाली आहे. ती सर्व रक्कम बीड एसीबीने जप्त केली आहे.
आधी खाडेंचे घर सील पुन्हा
घेतली झाडाझडती
हरिभाऊ खाडे हे बीडमधील चाणक्यपुरी येथील किरायाच्या घरात राहत होते. ते पुण्याला असल्याने घर बंद होते. एसीबीने ते सुरवातीला सील बंद केले होते. घर झडतीसाठी न्यायालयात परवानगी मागितली होती, त्यानुसार न्यायालयाने परवानगी देताच खाडेंच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी दोन नायब तहसिलदार, घर मालकाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली, याच झडतीमध्ये खाडेंच्या घरात मोठे घबाड सापडले आहे.
पुढील कारवाई करणार – ठाकूर
लाच प्रकरणातील पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी या दोघांनाही निलंबीत केले आहे. आता पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटले आहे.
खाडेंच्या घरातील या वस्तू
जप्त
एक कोटी आठ लाखांची कॅश
970 ग्रॅम सोन्याचे दागिणे – किंमत 72 लाख
पाच किलो चांदी – किंमत साडे चार लाख
सहा ठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे
टमरेल वाजलेल्या बँकेतील किती
घोटाळेबाजांना खाडे अन् जाधवरांनी लुटले?
बीडमधील काही पंतसंस्था आणि मल्टिस्टेट बँकांचे टमरेल वाजलेले आहे. यापैकी अनेक बँकांचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे होता, परिणामी बँकांचे टमरेल वाजवून ठेवीदारांना लुटणार्या घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी आतापर्यंत पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहाय्यक फौजदार जाधवर यांनी किती कोटी खाल्ले आणि तेही कोण-कोणत्या घोटाळेबाजांकडून लाटले या विषयी आता संपूर्ण बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.