बीड, दि.15 (लोकाशा न्यूज) : देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान अद्याप संपायचे आहे असे असतांनाही बुधवारी अचानकच सोशलमिडियामध्ये बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांची बदली झाल्याची चर्चा सुरू झाली. नेटकर्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींची नावे घेवून हे बीडचे नवे पोलिस अधिक्षक असल्याच्या पोस्टही फिरवल्या. अगदी डिपार्टमेंटमध्येही खरेच बदली झाली का? यावरून चर्चा सुरू झाल्याच्या पहायला मिळाल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत अशा कुठल्याही बदलीचे आदेशही नाहीत आणि आचारसंहिता काळात बदली करण्यासाठी परवानगी मागण्याचा प्रस्तावही निवडणुक आयोगाकडे गेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नंदकुमार ठाकुर हेच बीडचे पोलीस अधिक्षक राहणार असल्याचे चित्र आहे.
बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या बदलीच्या चर्चा अधुनमधून सुरूच असतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी देखील पोलीस अधिक्षक ठाकुर यांची बदली होईल असे बोलले जात होते मात्र तसे झाले नाही. आता लोकसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी संपले, त्यानंतर बुधवारी दुपारी अचानकच पोलीस अधिक्षक ठाकुर यांच्या बदलीची चर्चा सोशलमिडियामध्ये सुरू झाली. विशेष म्हणजे काही राजकीय व्यक्तींच्या नावाने चालविल्या जात असलेल्या फेसबुकच्या ग्रुपवर अशा पोस्ट पहायला मिळू लागल्या. दोन तीन आयपीएस अधिकार्यांच्या नावाने हे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून देखील पोस्ट पडायला सुरूवात झाली. त्यामुळे खरेच एसपींची बदली झाली का? याच्या चर्चा उशिरापर्यंत सुरू होत्या. या संदर्भात गृहविभागाशी संपर्क केल्यानंतर मात्र अशा कोणत्याही चर्चांना आज तरी कोणताच अर्थ नसल्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी स्पष्ट केले.
—