बीड

शेतकरी जगाचा पोशिंदा, मग त्याच्याच पदरी उपेक्षेचं जगणं का?, बीडमध्ये ओमप्रकाश शेटे गहिवरले, भर दुष्काळात खडकाळ जमिनीवर 900 केशर आंब्यांची बाग फुलविणार्‍या गोकुळ नखाते, संतोष नखातेंसह कुटूंबियांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने जिल्हास्तरावर झाला सन्मान


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : शेती म्हणजे एक जुगारचं, कारण शेतात टाकलेला पैसा परत येईल का नाही याची थोडीही हमी नसते, तरीही शेतकरी न डगमगता आपल्या शेतात बिनधास्तपणे पैसा टाकून काबाडकष्ट करत असतो, वर्षानुवर्षे काबाड कष्ट करूनच आवरगाव (ता.धारूर) येथील शेतकरी गोकूळ नखाते, संतोष नखाते या बापलेकाने आपल्या शेतात कमालच केली आहे. भर दुष्काळात आणि खडकाळ जमिनीवर तब्बल 900 केशर आंब्यांची बाग फुलविण्याचे काम त्यांनी केले आहे. शेतात राबणार्‍या याच शेतकरी कुटूंबियांचा गुढी पाडव्याच्या पुर्व संध्येला (ता. 8 एप्रिल) बीडमध्ये राज्य लोकतंत्र या दैनिकाच्यावतीने आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान केला आहे. त्यांना हा सन्मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक तथा आयुष्यमान भारत समिती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशाचा पोशिंदा असणार्‍या शेतकर्‍यांच्या अडचणींवर प्रश्‍न उपस्थित करताना यावेळी शेटेंना गहिवरून आले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा, मग त्याच्याच पदरी उपेक्षेचं जगणं का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
    गोकुळ हिराभाऊ नखाते हे आदर्श आवरगाव (ता. धारूर जि. बीड) येथील रहिवाशी आहेत, त्यांना आवरगाव येथे पावणे आठ एकर शेती असून याच शेतीवर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो,  वास्तविकता पाण्याचा ठोस असा सोर्स नसल्यामुळे शेती करणे आणि त्यातून उत्पादन पदरात पाडून घेणे हे त्यांच्यासमोर खूपच कष्टाचे काम, मात्र समोर आलेल्या प्रत्येक अडचणींना तोंड देऊन त्यांनी त्यांची पत्नी सुदामती त्यांचा मुलगा संतोष आणि त्यांची सून कविता या सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन ते खडकाळ जमिनीतही दरवर्षी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत, मात्र आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्यासाठी व आपल्या नातवांना चांगले शिक्षण देण्यासाठी शेतीत असे ठोस काहीतरी करून आर्थिक परिस्थिती सुधारायचीच असा निश्‍चय त्यांनी आणि त्यांचा मुलगा संतोष नखाते यांनी केला आणि खडकाळ जमिनीत मागचा पुढचा कोणताही विचार न करता तब्बल 900 केसर आंब्यांची लागवड केली, आज भर दुष्काळातही या बाप लेकाच्या कमालीमुळे ही केसर आंब्याची बाग चांगल्या प्रकारे डोलत आहे, वर्षात  बागेतील एका एका झाडाची उंची 6 फुटाच्या जवळपास पोहचली आहे,  येणार्‍या काही दिवसात याच बागेतून  लाखोंचे उत्पन्न आदर्श शेतकरी गोकुळ नखाते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात पडणार आहे, एक प्रामाणिकता, चांगली नीतिमत्ता आपल्या डोळ्यासमोर ठेवून एक आदर्श शेतकरी काय करू शकतो हेच गोकुळ नखाते आणि संतोष नखाते यांनी आपल्या कामातून खर्‍या अर्थाने दाखवून दिले आहे, या बागेसाठी आत्तापर्यंत लाखो रुपयांचा खर्च झालेला आहे, या खर्चामुळे थोडेही न डगमगता ही आंब्याची बाग आलीच पाहिजे त्याच्यासाठी जिवाचे रान करू असा  निश्चयही आवरगावचे आदर्श शेतकरी गोकुळ नखाते आणि त्यांचा मुलगा संतोष नखाते, त्यांची पत्नी सुदामती आणि सून कविता नखाते यांनी केलेला आहे, दिवसभर हे चौघेही याच केसर आंब्याच्या बागेत बसून असतात आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे,  एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या 900 केसर आंब्याची काळजी ते घेत आहेत, या दुष्काळानंतर भविष्यातही ते फळबागेचे क्षेत्र वाढवणार आहेत. वास्तविकता गोकुळ नखाते आणि त्यांचे कुटुंबीय हे वृक्षावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आहेत,त्यामुळेच त्यांच्या शेतात याच केसर आंब्यासह नारळ, चिकू, केळी, लिंबूनी, सफरचंद हीही झाडे डोलताना आज पाहायला मिळत आहे. गोकूळ नखाते, संतोष नखातेंसह त्यांच्या कुटूंबियांचे काबाडकष्ट पाहूण त्यांनी भरदुष्काळात खडकाळ जमिनीवर फुलविलेल्या 900 केशर आंब्यांची दखल घेवूनच  त्यांचा आठ एप्रिल रोजी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदर्श शेतकरी पुरस्कारने राज्य लोकतंत्र दैनिकामार्फत सन्मान करण्यात आला आहे. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्राचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड, इन्फंट इंडियाचे संचालक दत्तात्रय बारगजे, पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक गोवर्धन दराडे, निवासी संपादक गणेश मोकाशी, कार्यकारी संपादक अशोक खाडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान हा सन्मान गोकूळ नखाते, संतोष नखाते, सुदामती नखाते, कविता नखाते, सार्थक नखाते, स्वरा नखाते या सर्वांना भविष्यासाठी एक उर्जा देणाराच ठरणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!