बीड

लग्न सराईच्या काळात बाल विवाह आटोपल्यास अजामीन पात्र गुन्हा

बीड,दि. 5 (जिमाका): बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन अभियान अतिशय कडकडीने राबविण्यात येत आहे. सध्या लग्नसराईचा काळा सुरू आहे. या कालावधीत बाल विवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू आहे. त्यानुसार बाल विवाह आयोजित करणे हा अजामीन पात्र गुन्हा असून या काळात बाल विवाह लावल्यास कायदेशीर कार्यवाहीस समोरे जावे लागेल. त्यामुळे बाल विवाह होऊ न देणे हे समाजाच्या विकासासाठी चांगले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुधीर ढाकणे यांनी पत्राव्दारे कळविले आहे.
बीड जिल्हयात बाल विवाह होवू नये म्हणून आवश्यक त्या उपाय योजना करणे सुरू आहेत. बाल विवाह हि प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे बाल विवाह बेकायदा ठरतात. या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. तसेच सदर कायद्याच्या अमलबजावणी संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. बीड जिल्हयातील संबधित कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात बाल विवाह होवू नये यासाठी प्रचार प्रसार, जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात.
बाल विवाह कायद्याने गुन्हा आहे. बाल विवाहाचे आयोजन करणे, साखरपुडा करणे, लग्नाची बोलणी करणे, किंवा बाल विवाहाला प्रोत्साहन भेटल अशी कोणतेही कृती करणे याकरिता वधु व वर यांचे आई वडील, मामा मामी, इतर नातेवाईक भटजी, मंडपवाले, सजावटवाले, फोटोग्राफर, पाणीवाले, आचारी, व-हाडी मंडळी या सर्वावर बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 मधील कलम 9 व 10 मधील तरतूदी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येतो.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने मंगल कार्यालय मालक / व्यवस्थापक, धार्मीक स्थळांचे व्यवस्थापक, यांनी वर (मुलगा) व वधू (मुलगी ) यांच्या वयाची खात्री शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम उता-यावरुन करावी. असे आवाहन सुधीर ढाकणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बीड यांनी केले आहे.
बाल विवाह होत असल्यास किंवा संकटग्रस्त बालकांसबंधी कोणतेही घटना लक्षात आल्यास त्याबाबत चाईल्ड लाईन बीड क्रं.1098 या टोल फ्री, क्रंमाकावर माहिती देण्यात यावी. माहिती देण्या-यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येते. अधिक माहितीसाठी अश्विनी जगताप जिल्हा समन्वयक जिल्हास्तरीय चाईल्ड हेल्प लाईन कक्ष बीड, वरद प्राईड कॉम्प्लेक्स पहिला मजला धानोरा रोड बीड ([email protected]) या ठिकाणी संपर्क करण्यात यावा.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!