बीड, दि. 2 (लोकाशा न्यूज) : लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. याअनुषंगानेच सध्या नेत्यांच्या गाठी-भेटींनाही वेग आल्याचे पहायला मिळत आहे. राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनीही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची आशिर्वादपर भेट घेतली आहे. त्यावर पंकजाताईंना शुभाशिर्वाद देत मी तुमच्या प्रचारासाठी बीडला येणार असल्याचे आठवलेंनी ताईंना सांगितले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील अनेक नेत्यांना ताकत देवून त्यांना मानाच्या पदावर बसविण्याचे काम खर्या अर्थाने केले. त्यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध होते, विशेष म्हणजे रामदास आठवले, महादेव जानकर, मेटे, राजू शिट्टींसोबत मोट बांधून भाजपला सत्तेपर्यंत पोहचविण्याचे काम खर्या अर्थाने स्व. मुंडेंनी केले होते, मुंडेंसोबत असलेले हेच राज्यातील दिग्गज नेते आजही पंकजाताईंसोबत आहेत. यापैकी रामदास आठवले हे सध्या महायुतीतच असून ते मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री आहेत. नुकतीच रामदास आठवले यांची आशिर्वादपर पंकजाताईंनी भेट घेतली आहे, याभेटीत आठवले पती-पत्नीने पंकजाताईंना शुभाशिर्वाद दिले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे मी तुमच्या प्रचारासाठी बीडला आवर्जून येणार असल्याचेही यावेळी रामदास आठवले यांनी पंकजाताईंना सांगितले आहे. दरम्यान आठवलेंनी घेतलेल्या याच भुमिकेमुळे बीड जिल्ह्यात पंकजाताईंची शक्ती आणखी वाढणार आहे.