बीड दि.5 (प्रतिनिधी):
बीड जिल्हा परिषदेच्या सन 2024-25 या आगामी वर्षासाठीचे अर्थसंकल्पीय बजेट संदर्भात मुख्य प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदच्या सर्व विभाग प्रमुखांची व गटविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंगळवार दिनांक 5 मार्च 2024 रोजी घेण्यात आली. या बैठकीमध्ये संभाव्य बजेट संदर्भात चर्चा करण्यात आली. येत्या दोन दिवसांमध्ये जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात येणार आहे. तसेच मार्च अखेर प्रलंबित असलेले कामाचा सविस्तर अहवाल संबंधित विभाग प्रमुख आणि तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांनी सादर केला. सदर कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासंदर्भात तातडीने सर्वांनी प्रयत्न करावेत. सर्व निधी उपक्रमनिहाय नियमानुसार खर्च करण्याच्या सूचना प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांनी दिल्या. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 2024-25 वर्षाचे अर्थसंकल्पीय नियोजन करण्यात यावे, याबाबतही संगोपन चर्चा सदर बैठकीत झाली. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील उपक्रम आणि योजना तातडीने पूर्ण करण्यात याव्यात याबाबतही सदर आढावा बैठकीत सूचना देण्यात आल्या.
बैठकीस बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. तर सर्व गटविकास अधिकारी हे ऑनलाईन उपस्थित होते.















