बीड

26 फेब्रुवारीपासून जिल्हा पोलिस दलाची आयजींकडून होणार तपासणी, 28 फेब्रुवारीला वीरेंद्र मिश्रांचा बीडमध्ये मुक्काम, 29 फेब्रुवारीला अधिकार्‍यांसोबत होणार बैठक  


बीड, दि. 20 (लोकाशा न्यूज) : जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. 26 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा हेही तपासणी करणार आहेत. यासाठी सध्या पोलिस दलाकडून तयारी केली जात आहे. दरम्यान 28 फेब्रुवारीला ते बीडमध्ये मुक्कामी थांबणार आहेत.
पोलिस दलाची आयजींकडून दरवर्षी तपासणी केली जात असते. यंदा परिक्षेत्रीय तपासणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आयजी ज्ञानेश्‍वर चव्हाण यांच्या बदलीनंतर नव्याने आयजी म्हणून पदभार स्विकारलेले वीरेंद्र मिश्रा हे वार्षिक तपासणी करणार आहेत. पदभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच या निमित्ताने जिल्ह्यात येणार आहेत. 26 फेब्रुवारीपासून या वार्षिक तपासणीला सुरवात होणार आहे. यात 26 रोजी गेवराई उपविभागाची तपासणी केली जाणार आहे. तलवाडा पोलिस ठाण्याला दुपारी 12 वाजता आयजी भेट देणार आहेत. त्यानंतर कर्मचार्‍यांचा दरबार घेतला जाईल, 27 फेब्रुवारी रोजी माजलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची तपासणी होणार आहे. दुपारी 2 वाजता माजलगाव ग्रामीण ठाण्याची तपासणी व कर्मचार्‍यांचा दरबार होणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी  विविध शाखांना भेट दिली जाणार आहे. यात स्थानिक गुन्हे शाखा, भरोसा सेल, वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर ठाणे  आणि दोषसिध्दी शाखेची तपासणी केली जाणार आहे. 28 फेब्रुवारीला ते बीडमध्ये मुक्कामी थांबणार आहेत, त्यानंतर 29 फेब्रुवारी रोजी परेड, कर्मचार्‍यांचा दरबार, अधिकार्‍यांची बैठक घेवून ते पुन्हा छ.संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!