बीड

श्रीक्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी पंकजाताई मुंडे यांचं जोरदार स्वागत, तुमचं दुःख हे माझं दुःख ; तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढत राहील, गांव चलो अभियानांतर्गत पौंडूळ ग्रामस्थांशी साधला संवाद, गोरगरिबांसाठी विविध योजना राबवून पंतप्रधान मोदींनी देशात रामराज्य आणलं

बीड ।दिनांक १२।
जात पात धर्म न बाळगता वंचितांच्या सेवेचा आणि कल्याणाचा एक संकल्प घेऊन मी राजकारणात आलेले आहे, तुमचं दुःख हे माझं दुःख आहे, तुमच्या सर्व वेदना माझ्या पदरात टाका, तुम्हाला सर्व सुखं मिळावीत, यासाठी मी आयुष्यभर लढत राहील,नगद नारायणाने आशीर्वादरूपी एवढी शक्ती मला द्यावी अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

भाजपच्या गांव चलो अभियानांतर्गत पंकजाताई मुंडे यांनी रविवारी रात्री श्रीक्षेत्र नारायण गडाच्या पायथ्याशी असलेल्या पौंडूळ गावात जाऊन ग्रामस्थांशी हितगूज साधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देऊन ‘फिर एक बार मोदी सरकार’चा नारा त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांचं वाजत-गाजत मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केलं.

पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर तुम्ही खूप प्रेम केले, त्यांच्या जाण्याचं दुःख मुलगी म्हणून मला आहेच, पण तुम्हाला जास्त वेदना झाल्या, आजही तुमच्या डोळ्यात येणारे अश्रू त्यांची उणीव दाखवून देतात. साहेबांनी मला कधीही जातीपातीच राजकारण शिकवलं नाही, मी एकच जात मानते ती म्हणजे वंचितांची..त्यांची सेवा मला कायम करायचीयं. ताई ते ताईसाहेब ही जबाबदारी मोठी आहे, यातील ‘साहेब’ हे नाव कधीही खराब होऊ देणार नाही असा शब्द देते.

मोदींमुळे देशात ‘रामराज्य’

नरेंद्र मोदी हे संघर्ष व गरिबीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे. गरीबी जवळून पाहिल्याने त्यांना या वर्गाविषयी विशेष आस्था आहे, म्हणूनच गेल्या दहा वर्षांत गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवून देशात रामराज्य आणलं. हे रामराज्य पुढच्या काळातही टिकावं यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. जिल्हयाचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी मी आणि खा.डॉ.प्रितमताई यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. रेल्वे, रस्ते, महामार्ग आणले, प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण केले असे त्या म्हणाल्या.

..तर वाघिणीसारखंच जगेन

तुम्ही केलेलं भव्य स्वागत आणि तुमचं प्रेम पाहून भारावून गेले. हे प्रेम आणि विश्वासाचा वर्षाव माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही मला वाघिण म्हटलं आहे तर पुढेही वाघिणीसारखंच जगेन. श्वासात श्वास असेपर्यंत तुमची सेवा घडावी एवढी शक्ती मला मिळावी अशी अपेक्षा पंकजाताईंनी बोलताना व्यक्त केली.

नारायण गडावर नतमस्तक

पौंडूळला येण्यापूर्वी पंकजाताई मुंडे यांनी श्रीक्षेत्र नारायण गडावर जाऊन संत नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी त्यांचे अगत्यपूर्वक स्वागत केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे आदींसह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!