बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या दुरदृष्टीमुळे जिल्ह्याच्या विकासाला प्रचंड प्रमाणात गती मिळू लागली आहे. बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भातच त्यांनी मंगळवारी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात जावून भेट घेतली. यावेळी बीड आणि लातूर जिल्ह्याला जोडणारा महामार्ग क्र. ‘548 ब’ या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या प्रश्नवर यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली, त्यानुसार या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. याबरोबरच या रस्त्याच्या कामाचा रस्ते विकास मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनातही लवकरच समावेश होणार आहे. खा. मुंडेंकडून सुरू असलेल्या या विकास कामामुळे बीड जिल्हावासियांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुंडे भगिणी धडाडीने काम करीत आहेत. खा. प्रीतमताईंमुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झालेले आहे. याबरोबरच त्या सातत्याने जिल्ह्यातील रस्त्यांचे प्रश्न सोडवित आहेत. रस्ते विकासाच्या संदर्भातच त्यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. बीड आणि लातूर जिल्ह्याला जोडणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 ब या रस्त्याचे अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगावपर्यंत चौपदरीकरण करण्यात यावे, आणि सदरील कामाचा समावेश रस्ते विकास मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात करण्यात यावा, अशी मागणी यावेळी गडकरींकडे खा. मुंडेंनी केली. त्यावर ना. गडकरींनीही खा. मुंडेंच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन सदरील कामाचा मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समावेश करण्याचा विश्वास दिला. दरम्यान परळी तालुक्यातील सिरसाळा-पोहनेर या रस्त्याच्या कामाला केंद्रीय रस्ते निधीतून मंजूरी दिल्याबद्दल यावेळी खा. मुंडेंनी ना. गडकरींचे आभार मानले.