बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : सोमवारी जिल्ह्यातील कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामांचा खा. प्रीतमताई मुंडे यांच्या हस्ते श्रीगणेशा करण्यात आला. तसेच दिव्यांग पूर्व तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या पाटोदा तालुक्यातील लाभार्थ्यांनाही नि:शुल्क सहाय्यक साधनांचे खा. प्रीतमताईंनी वितरण करून त्यांना मोठा आधार देण्याचे काम खर्या अर्थाने केले. त्यांच्याकडून सुरू असलेल्या या कामाचे संपूर्ण जिल्हाभरातून कौतूक केले जात आहे.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी नेहमीच बीड जिल्ह्याचे हित आपल्या डोळ्यासमोर ठेवून काम केले, त्यांच्या पश्चात अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून लोकनेत्या पंकजाताई आणि खा. प्रीतमताई मुंडे ह्या धडाडीने आणि ताकतीने काम करीत आहेत. मागच्या दहा वर्षात खा. प्रीतमताईंनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न खर्या अर्थाने केलेला आहे. महामार्गांसह नगर-बीड-परळी रेल्वेचा प्रश्नही खा. मुंडेंच्याच माध्यमातून सुटलेला आहे. विशेष म्हणजे खा. प्रीतमताईंच्या तत्परतेमुळेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्तेही टकाटक होताना दिसून येत आहेत. या रस्त्यांसाठी लागणारा निधी त्या सातत्याने खेचून आणत आहेत. त्यानुसार प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत कोट्यावधी रूपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भुमिपुजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. ताईंनी कोट्यावधींचा निधी खेचून आणल्यामुळेच आज हे रस्ते टकाटक होत आहेत. सोमवारी वडवणी तालुक्यातील तिगाव तांडा इथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत होणार्या रस्त्याचे त्यांनी भूमिपूजन केले. यावेळी भाजप नेते रमेशराव आडसकर, तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे, मच्छिन्द्र बाप्पा झाटे, संजय आंधळे, धनराज मुंडे यांच्यासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. या रस्त्याच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना दळणवळनाची दर्जेदार सुविधा मिळणार असून ग्रामीण भागाला मुख्य रस्त्यांशी जोडणारा हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी वाहिनीची भूमिका पार पाडणार असल्याचे खा. प्रीतमताईंनी यावेळी म्हटले आहे. तसेच दिव्यांग पूर्व तपासणी शिबिरात पात्र ठरलेल्या पाटोदा तालुक्यातील लाभार्थ्यांनाही नि:शुल्क सहाय्यक साधनांचे खा. प्रीतमताईंनी वितरण करून त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले. या कार्यक्रमाला विधानसभा सदस्य आ. बाळासाहेब आजबे,अजय धोंडे,नगराध्यक्षा दीपाली जाधव, सुधीर घुमरे, मधुकर गर्जे,भगवान येवले, पांडुरंग नागरगोजे, सुवर्णा लांबरुड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















