बीड

अग्रीममधून सुरू असलेली कर्ज वसूली आता थांबणार, दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांसाठी  जिल्हाधिकार्‍यांनी घेतला मोठा निर्णय,अग्रीमच्या रक्कमेतून कर्ज वसूली होता कामा नये, दिपा मुधोळ यांचे जिल्ह्यातील सर्वच बँकांना स्पष्ट आदेश  


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : सध्या पडलेल्या दुष्काळाचा जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्‍यांना सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मात्र  जिल्ह्यातील बँका शेतकर्‍यांच्या पीक विमा अग्रीमच्या रक्कमेतून बिनधास्तपणे कर्ज वसूली करत आहेत. या वसूलीमुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुष्काळात होरपळणार्‍या जिल्ह्यातील याच शेतकर्‍यांना आधार म्हणून जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अग्रीमच्या रक्कमेतून कर्ज वसूली करू नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी जिल्ह्यातील सर्वच बँकांना दिले आहेत. त्यामुळे पीक विमाच्या अग्रीममधून सुरू असलेली कर्ज वसूली आता पुर्णपणे थांबणार आहे.
  या वर्षीच्या खरीप आणि रब्बीच्या हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पडलेल्या याच दुष्काळामुळे खरीपातील शेतकर्‍यांना अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात अग्रीमची रक्कमही खर्‍या अर्थाने जमा होत आहे. वास्तविक पाहता बीड जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात अडकलेला आहे. अशा वेळीही  जिल्ह्यातील बँका पीक विमा अग्रीमच्या रक्कमेमधून बिनधास्तपणे कर्जाची वसूली करत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे प्राप्त होत आहेत. या तक्रारींची जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी तात्काळ दखल घेवून जिल्ह्यातील बँकांना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापकांमार्फत एक पत्र काढले आहे. पीक विमा अग्रीममधून बँकांनी शेतकर्‍यांच्या कर्जाची वसूली करू नये, असे स्पष्ट आदेश त्यांनी जिल्ह्यातील बँकांना दिले आहेत. यामुळेच आता अग्रीममधून सुरू असलेली शेतकर्‍यांची कर्ज वसूली पुर्णपणे थांबणार आहे.

दै. लोकाशाच्या भुमिकेला कलेक्टरांनी
दाखवला हिरवा कंदील
जिल्ह्यातील बँकाकडून शेतकर्‍यांच्या अग्रीमच्या रक्कमेतून सुरू असलेल्या कर्ज वसूली संदर्भात दै. लोकाशानेही सातत्याने बातम्यांच्या माध्यमातून आवाज उठविला होता. दै. लोकाशाच्या या आवाजाचीही जिल्हाधिकार्‍यांनी खर्‍या अर्थाने दखल घेतली असल्याचे त्यांनी केलेल्या कारवाईवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!