
बीड | 24 ऑक्टोबर 2023 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगावमध्ये जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायास संबोधित केलं. पंकजाताई दसरा मेळाव्याला काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचं लागलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणाला जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. अखेर पंकजाताईंनी आज आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. प्रितमताई घरी बसणार नाहीत आणि दुसऱ्याच्या मेहनतीचं मी खाणार नाही, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या. आता पडणार नाही तर पाडणार, असंही पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.
काम करत असताना मी पडले. निवडणुकीत मी पडले. पडले तर मग काय झालं? राजकारणात पडतातच ना लोकं? कधीतरी पडतात ना? माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊन चालावं लागेल की नाही? या कुबड्या एक तर मला पार्टी देऊ शकते किंवा जनता देऊ शकते. माझ्या जनतेने मला एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यात मला मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याची ताकद तयार झाली”, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.
हात जोडून मी माफी मागते’
“मी मनाने कधीच खचले नाही. मला कधीच वाटलं नाही की माझ्या तसूभर काही कमी आहे. मला एकच वाटलं की, तुमच्या सेवेत खंड आला. हात जोडून मी माफी मागते. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. हे मंचावरच्या लोकांना तेवढा त्रास होत नसेल. ज्यांना पद-प्रतिष्ठा मिळते त्यांचं भागून जातं. पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो”, असं पंकजाताई कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या.
दरवेळी तुम्ही आशा लावता. दरवेळी तुम्हाला वाटतं, आमची ताई अमूक, आमची ताई तमूक, पण दरवेळी तुमची अपेक्षाभंग होते. मी जेव्हा दोन महिन्याची रजा घेतली. माझ्यामध्ये फक्त नीतीमत्ता आहे. गोपीनाथ मुंडेंची लेक म्हणून हिंमत आणि माझ्या लोकांवरचा असलेला विश्वास”, असं पंकजाताई म्हणाल्या.
पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही’
“माझ्यावर रोज आरोप होतो. कुणी म्हणतं ताई या पक्षात चालल्या, कुणी म्हणतं ताई त्या पक्षाच चालल्या, कुणी म्हणतं आम्हाला असं कळलं, कुणी म्हणतं आम्हाला तसं कळलं, पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पदं देवून तुम्हाला ती मिळवता आली नाही. पदं न देता निष्ठा काय असते ती या लोकांना विचारा. यांच्या मनावर हजार आघात झाले, दहा वेळा यांचे स्वप्न तुटले. तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहेत”, अशी भूमिका पंकजाताई मुंडे यांनी मांडली.
पडले तर पडले. कोण पडत नाही? ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा युद्धांमध्ये हरले. भैरवांनी तर ब्रह्माचं एक शीर खेटून टाकलं आहे. शिवाला सुद्धा हनुमानासमोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलं आहे. विष्णुला सुद्धा संकटाला सामोरं जावं लागलं आहे. या देवांना संकट आहे, देवीला सुद्धा लाखो असुरांसोबत युद्ध करावं लागतं तर आपण युद्धाला का तयार राहणार नाही?”, असा सवाल पंकजाताईंनी यावेळी केला.
आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत’
“हे लेकरं म्हणत आहेत, भगवान बाबांनी आपल्यावर सावली धरली आहे. ऊन आपल्याला नाही. आता आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर ऊन्हात बांधू. आता माझी माणसं ऊन्हात राहणार नाहीत. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. आता माझी माणसं भगवान शिवाचं रुप आहेत. शिवशंकर खूप भोळा आहे. पण त्याला सुद्धा तिसरा डोळा आहे”, असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला.
सकाळी परमपुज्य मोहन भागवत यांचा दसरा मेळावा झाला. त्यांनी सांगितलं की नीतीमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणं हे देशाच्या हिताचं नाही. त्यामुळे तुम्ही जिंकण्यासाठी नीतीमत्ता गहाण ठेवू शकत नाहीत”, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.