बीड

कलेक्टर, सीईओंमुळे रेशीम खरेदी केंद्राला मिळाला बुस्टर, बीड बाजार समितीत 3 महिन्यात 224 टन कोषाची आवक, संचालक मंडळाच्या मेहनतीला आले फळ


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : महाराष्ट्रातील रेशीम कोष खरेदीत छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रास प्रचंड प्रतिसाद मिळत असून या खरेदी केंद्रात गेल्या 3 महिन्यांमध्ये 2 लाख 24 हजार 287 किलो म्हणजेच जवळपास 224 टन रेशीम कोषाची आवक झालेली आहे. बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ मुंडे, सीईओ अविनाश पाठक यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यशाळानंतर मोठा बुस्टरया खरेदी केंद्रास मिळालेला आहे.
दि. 1 जुलै 2023 ते दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 3 महिन्यात आलेल्या 224 टन रेशीम खरेदीचे शेतकर्‍यांना 11 कोटी 1 हजार 993 रुपये अदा करण्यात आलेले आहेत. यामध्ये दिनांक 02 ऑक्टोबर 2023 रोजी विक्रमी अशा 10 टन 4 क्विंटल रेशीम कोषाची आवक नोंदविण्यात आली. शेतकर्‍यांच्या विश्वास जिंकण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ, सभापती, उपसभापती, सचिव व स्वतःला झोकून देत या रेशीम केंद्रात काम करत असलेले बाजार समितीचे कर्मचारी मेहनत घेत आहेत. रेशीम विभागाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट यांचेही मोठे योगदान यामध्ये आहे. बाजार समितीत निवडणुकांमध्ये विजय मिळवलेल्या परिवर्तन आघाडीची सत्ता स्थापन होताच रेशीम शेतकर्‍यांच्या थकलेल्या रकमेचा प्रश्न समोर उभा होता. यावेळी सभापती, उपसभापती व संचालक मंडळांनी स्वतः पैसे देऊन रेशीम बाजार टिकवायला मदत केली. जवळपास 1 कोटी 12 लक्ष रुपये हे जवळपास 500 शेतकर्‍यांचे थकलेले दिल्यामुळे शेतकर्‍यांचा विश्वास या बाजार समितीवर द्विगुणित झाला.

रेशीम उपसंचालक ढवळे, रेशीम
अधिकारी वराट यांचे विशेष सहकार्य
छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड या ठिकाणच्या रेशीम कोष खरेदी केंद्राकडे रेशीम विभागाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट यांचेही विशेष योगदान असून जिल्ह्यात रेशीम लागवडीस प्रोत्साहन देण्याचे काम या अधिकार्‍यांकडून सातत्याने सुरू असते. राज्यात बीड जिल्हा रेशीम लागवडीत व उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून या दोन्ही अधिकार्‍यांचे याबाबत विशेष योगदान असते.

रेशीम कोष खरेदी केंद्राची वैशिष्ट्ये
1) 24 ते 48 तासांत शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे
2) मराठवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने शेतकर्‍यांच्या सोयीचे केंद्र
3) सर्व खरेदी केंद्र सीसीटिव्ही निगराणीखाली.
4) शेतकर्‍यांच्या रेशीम शेतीसंबंधी माहिती, अनुदान तसेच विविध योजनांबाबत बाजार समितीच्या वतीने मार्गदर्शन, मदत तसेच कार्यशाळा आयोजन
5) रेशीम संबंधी साहित्य खरेदी केंद्रांची बाजार समिती आवारात उपलब्धता
6) दररोज किमान 1 तरी संचालकांची रेशीम खरेदी केंद्रात उपस्थिती
7) बाजार समितीच्या वतीने संपूर्ण स्वच्छता, मुबलक मनुष्यबळाची उपलब्धता

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!