बीड

अंबाजोगाईतील साकुड येथे देशी गोवंशाचे होणार जतन, 6 कोटींच्या निधीस मान्यता ; आ.नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यास यश

Namita Akshay Mundada, BJP, Kaij (Beed)

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – लाल कंधारी व देवणी गोवंश प्रजातीचे जतन व संवर्धनाकरिता अंबाजोगाई तालुक्यातील मौजे साकुड येथे पशुसंवर्धन विभागाची 81 हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. देवणी व लाल कंधारी गोमाता जतन संवर्धन व्हावे, प्रक्षेत्र उभारणी व्हावी या करीता आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी यावर्षी जानेवारी पासून ते सदर प्रकल्प मंजुर होईपर्यंत मागील दोन महिन्यांपासुन सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्यशासनाने यासाठी सहा कोटींच्या निधीस मान्यता दिली असून यात केंद्र शासनाकडे ही 54 कोटी रूपयांच्या निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे कळते.

लाल कंधारी व देवणी या देशी गोवंशाचे मूळ पैदास क्षेत्र मराठवाड्यात असून, सदर गोवंशाचे अस्तित्व मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानबाद, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यात आहे. या स्थानिक जातींचे वैशिष्ट्ये म्हणजे सदर जाती या दूध उत्पादन व नर पशुधन शेतीकामासाठी उपयुक्त आहेत. मात्र, 2013 मध्ये लाल कंधारी गायींची संख्या 1, 26, 609 इतकी होती, ती 2020 मध्ये 1, 23, 943 इतकी कमी झाली आहे. तसेच 2013 मध्ये देवणी गायींची संख्या 4, 56, 768 वरून सन 2020 मध्ये 1, 49, 159 इतकी कमी झाली आहे. सदर प्रजातींचे महत्व विचारात घेऊन सदर जातींचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा निर्णय नूकताच राज्य सरकारने घेतला आहे. या बाबत साकुड पशुपैदास प्रक्षेत्रासाठी 13 नियमित पदे व 37 इतकी पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येतील. पशुधनासाठी चारा, पशुखाद्य, औषधी तसेच वीज, पाणी यासाठी दरवर्षी 6 कोटी इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. केज विधानसभा मतदार संघाचे आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी या विषयात लक्ष घालून जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत सातत्याने पाठपुरावा केला. पशुसंवर्धन खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रधानसचिव, आयुक्त पशु संवर्धन यांच्याकडे हा विषय लावून धरला. त्यामुळे मंजूरी मिळू शकली, मौजे साकुड ता.अंबाजोगाई (जि.बीड) येथे देवणी व लाल कंधारी गोमाता प्रक्षेत्र उभारणीसाठी मंजूरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितम मुंडे यांचे केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.

केंद्र शासनाकडे 54 कोटींच्या निधीसाठी प्रस्ताव :

केज विधानसभा मतदार संघाअंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील मौजे साकुड येथे लाल कंधारी व देवणी गोवंश प्रजातीचे जतन व संवर्धनाकरिता पशुसंवर्धन विभागाची 81 हेक्टर जमीन प्रक्षेत्र उभारण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळास देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. देवणी व लाल कंधारी गो-माता जतन संवर्धन व्हावे, प्रक्षेत्र उभारणी व्हावी या करीता आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आमच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्यशासनाने यासाठी सहा कोटींच्या निधीस मान्यता दिली असून यात केंद्र शासनाकडे ही 54 कोटी रूपयांच्या निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यात एक महत्वकांक्षी संशोधन केंद्र उभा राहणार असून त्याचा फायदा शेतकरी बांधव व पशुपालकांना होईल.

  • आ.नमिता मुंदडा (केज विधानसभा मतदार संघ.)

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!