बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हयात उद्या दि. 15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2023 उपक्रम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यात येणार असुन, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती मध्ये या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश पाठक यांनी केले आहे.
स्वच्छता ही सेवा 2023 ची संकल्पना कचरा मुक्त भारत ही असणार आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाई मित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यावर्षी परिसर स्वच्छतेचे उपक्रम राबविणे आवश्यक असून यामध्ये स्वयंस्फुर्तीने श्रमदान करणे गरजेचे आहे. या अभियानात ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटन स्थळे, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदी ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. तसेच सिंगल युज प्लास्टीक (डणझ) वापर व त्यांचे दुष्परिणाम याबाबत गावांमध्ये जनजागृती करणे, शालेय स्तरावर स्वच्छता मोहिम यांचे आयोजन करणे, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कच-यातुन उत्पन्न घेणे, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी भिंती चित्रे काढणे व कचरा वर्गीकरण पेटया ठेवणे यासारखे उपक्रम राबविणेत येणार आहेत. स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करुन स्वच्छतेचे उपक्रम राबविणेत येणार आहेत. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे, केंद्रीय मंत्री साधणार ऑनलाईन संवाद मा. मंत्री महोदय जलशक्ती मंत्रालय व मा.मंत्री महोदय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या हस्ते, दि. 15 सप्टेंबर 2023 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे स्वच्छता ही सेवा 2023 उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी ते संवाद कार्यक्रमाव्दारे सरपंच, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे. ओडीयफ प्लस मॉडेल झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. गावात प्रवेश केल्याबरोबर दिसणारी स्वच्छता कायम टिकण्यासाठी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती व गावातील ग्रामस्थांनी लोक सहभागातून श्रमदानाने स्वच्छ करावीत असे नियोजन केले आहे . अशी माहिती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीश्री सुधाकर मुंडे यांनी दिली आहे.















