घाटसावळी, दि. 10 (लोकाशा न्यूज) : धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून बीड कडे येत असणार्या रिक्षाला बीड वरून परळी कडे जाणार्या कंटेनरने चिरडले, या भिषण अपघातात रिक्षातील आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी असून त्यांना बीडच्या काकू नाना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा भिषण अपघात बीड परळी रोडवरील बकरवाडी फाट्यावर घडला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजीम शेख (रा. इस्लामपुरा राजू चौक) हे आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटे गव्हाण (ता. धारूर) येथे आपल्या सासरवाडीला गेले होते, रविवारी रात्री परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनर (एम.एच.12 आरएन 0873) आपला ताबा सोडला, यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला (एमएच 20 एफएफ 0312) जोराची धडक बसली, यामध्ये नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13) आणि अदनान अजीम शेख (वय 12) हे तिघे या अपघातामध्ये जागीच ठार झाल्याची धक्कदाय घटना घडली, रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून यांना उपचारासाठी बीडच्या काकू नाना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भारतींनी आपला ताफा पाठवून जखमीला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
—















