कडा / वार्ताहर
तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत आंबेवाडी शिवारात बीड -नगर महामार्गालगत असलेल्या अर्जुन बबन बागले यांच्या शेतात सुजलाम कंपनीच्या पवन चक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी रविवारी मध्यरात्री सहा दरोडेखोर डम्पर व जेसीबीसह आले असता अंभोरा पोलिसांनी पाच आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करुन जेरबंद करुन धडाकेबाज कामगिरी केली. यापैकी एकाने घटनास्थळावरुन पलायन केले. या कारवाईत अंभोरा पोलिसांनी एक डंपरसह जेसीबी असा पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी आरोपींना सोमवारी दि. २८ रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांना आंबेवाडी शिवारात सहा दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत आल्याची गोपनीय माहिती मिळाली असता, सपोनि ढाकणे यांनी पोलीस उपनिरीक्षक अदिनाथ भडके, पोलीस अंमलदार अमोल शिरसाठ, सतीष पैठणे, सुदाम पोकळे सहाय्यक फौजदार शांताराम रोकडे व पोकाॅ बाळू जगदाळे या पोलीस कर्मचा-यांना तात्काळ घटनास्थळी या कामगिरीवर पाठवून रविवारी मध्यरात्री सदर ठिकाणी एक डम्पर व एक जेसीबी घेऊन सहाजण संशयास्पद आढळून आले. मात्र याप्रसंगी पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपी
कृष्णा सर्जेराव दळवी (वय २८ वर्षे, रा. सारसनगर, अहमदनगर) अमोल नारायण खडके (वय ३० वर्षे, रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहमदनगर), कैलास पांडूरंग वाडेकर (वय ३२ वर्षे, रा. चिचोंडी पाटील, ता.जि. अहमदनगर), निखील दत्तात्रय खोले (वय २७ वर्षे, रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर), संतोष काशिनाथ फसले (वय २८ वर्षे, रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) अशा पाच जणांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडून जेरबंद केले. यापैकी संकेत भाऊ बेरड ( रा. निंबोडी, ता. जि. अहमदनगर) हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सहाय्यक फौजदार शांताराम सुर्यभान रोकडे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सदरील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सपोनि ढाकणे करीत आहेत. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.