बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : बीड बीईओंच्या नियुक्तीवरून सध्या बीड पंचायत समितीमध्ये चांगलाच वाद पेटला असल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून सोमवारी सकाळी विस्तार अधिकारी तुकाराम जाधव यांना दिलेली ऑर्डर अवघ्या काही तासातच रद्द झाली आहे. या गोंधळावरूनच नेमके अधिकारी आणि कर्मचार्यांनी कामे कशी करायची अशी उलट सुलट चर्चा बीडमध्ये सुरू झाली आहे.
बीड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी श्रीराम टेकाळे यांनी चांगल्या पद्धतीने काम केले. त्यांचा उजळणी पॅटर्न बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात गाजला, तब्बल 1 लाख 40 हजार विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम त्यांनी आपल्या पॅटर्नमधून केले. मागच्या महिनाभरापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता बीड पंचायत समितीचा नवा गटशिक्षणाधिकारी कोण? असा प्रश्न संपूर्ण बीड तालुक्याला पडलेला आहे. सिनॅरिटीनुसार विस्तार अधिकारी मधुकर तोडकर हे बीईओ म्हणून काम पाहू शकतात, मात्र त्यांनी यासाठी स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांच्यानंतर या पदावर तुकाराम जाधव हे काम करू शकतात, याअनुषंगानेच सीईओ अविनाश पाठक यांनी बीड बीईओ पदासाठी सदर विस्तार अधिकार्यांची परिक्षाही घेतली होती, जर तुकाराम जाधवांनी बीईओ म्हणून काम करण्यास नकार दिला तर त्यांच्यापाठोपाठ समंदर खान, तुकाराम पवार आणि प्रणिता गंगाखेडकर यांना सिनॅरिटीनुसार बीईओंचा पदभार देता येतो, मात्र तुकाराम जाधव हेच बीईओ म्हणून काम करण्यास ईच्छूक होते, त्यामुळेच सोमवारी सकाळी सीईओ अविनाश पाठक यांनी बीड पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार तुकाराम जाधव यांच्याकडे सोपविला, याचा लेखी आदेशही त्यांना देण्यात आला. त्यानुसार जाधव रूजू होण्यास बीड पंचायत समितीमध्ये गेले असता त्याठिकाणी काही जणांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यांच्या नियुक्तीवर अपेक्ष घेण्यात आला. विशेष म्हणजे याठिकाणी दोन गट आमने सामने आल्याने मोठा वादही होण्याची शक्यता होती, बीड पंचायत समितीत निर्माण झालेली ही परिस्थिती लक्षात घेवून शिक्षणाधिकार्यांनी तुकाराम जाधव यांना दिलेला आदेश अवघ्या काही तासातच रद्द केला. मला बीड बीईओ पदाचा पदभार नको, असे लेखी जाधव यांनी दिल्यामुळे त्यांची ऑर्डर रद्द केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता दोन गटात लागलेल्या या वादात बीड बीईओ पदाची धुरा नेमकी कोणाकडे जाते याकडे संपूर्ण बीड तालुक्याचे लक्ष आहे.















