बीड

हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा बीड बाजार समिती येथील एकदिवशीय कार्यशाळेला प्रतिसाद, रेशीम शेतीतून जिल्ह्याची ओळख बदलेल – जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे, प्रशासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करेल – सीईओ अविनाश पाठक

बीड(प्रतिनिधी):- किफायतशीर शेतीपूरक व्यवसाय असणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वळावे यासाठी काल दि. ०९ ऑगस्ट रोजी बीड कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन बीड बाजार समितीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील रेशीम कोष खरेदी केंद्र येथे करण्यात आलेले होते. या कार्यशाळेला हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थितीत राहत उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे या होत्या तर कार्यशाळेचे उदघाटन नवनियुक्त सीईओ अविनाश पाठक यांनी केले. दोन्ही अतिथींनी शेतकऱ्यांना रेशीम बाबत मार्गदर्शन करत असताना प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.

बीड बाजार समितीतील रेशीम कोष खरेदी केंद्र राज्यातील रेशीम उद्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. शेतकऱ्यांना रेशीम शेतीबद्दल तांत्रिक माहिती, विविध योजना व येणाऱ्या अडचणींबाबत इतम्भूत माहिती यावेळी उपस्थित मार्गदर्शकांनी दिली. यावेळी महेंद्र ढवळे (उपसंचालक, रेशीम, छ संभाजीनगर विभाग), समृत जाधव (जिल्हा उपनिबंधक), सुभाष साळवे (प्रकल्प संचालक, आत्मा, बीड), शंकर बी वराट (जिल्हा रेशीम अधिकारी, बीड), गोपालकृष्ण परदेशी (उपनिबंधक), रवींद्र इंगोले (मनरेगा प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढवून आपल्याला या जिल्ह्याची ओळख बदलायची असल्याचे म्हणत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील व ऊसतोड कामगारांच्या हाताला काम द्यायचे असेल तर रेशीम शेती वाढवावी लागणार असल्याचे मत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी मांडले तर सीईओ अविनाश पाठक यांनी रेशीम अंतर्गत शेतकऱ्यांना शासकीय योजना देण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचे म्हंटले. महेंद्र ढवळे (उपसंचालक, रेशीम, छ संभाजीनगर विभाग) यांनी शेतकऱ्यांना प्रशासकीय पातळीवरील अनुदान, योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी आम्ही सोडवू असे आश्वासन यावेळी दिले.

शंकर बी वराट (जिल्हा रेशीम अधिकारी, बीड) यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय सेवेत असल्याचे सांगितले. रवींद्र इंगोले (मनरेगा प्रशिक्षक) यांनी रोजगार हमी योजनेचा फायदा कसा घ्यायचा याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. सर्वाधिक रेशीम कोष विक्री बीड बाजार समिती करणाऱ्या प्रथम शेतकऱ्यास २१ हजार रुपये बक्षीस तर द्वितीय शेतकऱ्यास ११ हजार रुपये बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा उपसभापती श्यामसुंदर पडुळे यांनी केली. खरेदी केंद्रात कोष विकला कि २४ तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात येणार असे आश्वासन या कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना डॉ बाबू जोगदंड यांनी दिले. राज्यात सर्वाधिक रेशीम कोशास दर हा बीड बाजार समितीत मिळत असल्याचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक विश्वास आखाडे यांनी केले. यावेळी सभापती सौ. सरला कामराज मुळे, उपसभापती शामसुंदर विश्वंभर पडुळे यांच्यासह उद्धव पैठणे, संजय माने, आदिनाथ लांडे, बळीराम चव्हाण, प्रभाकर जोगदंड, शरद झोडगे, सौ ज्ञानेश्वरी काळकुटे, सौ. सुभद्रा माने, नितीन फड, विश्वास आखाडे, धनंजय गुंदेकर, दीपक काळे, गणेश उगले, अरुण गोरे, राधेश्याम कासट, हनुमान जगताप यांच्यासह सचिव हारुण पठाण व सर्व कर्मचारी वृंद, हजारो शेतकरी यांची यावेळी उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!