छत्रपती संभाजीनगर – शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून असलेले राज्यभरातील लाखो तरूण-तरूणी राज्य सरकारच्या विविध विभागांमधील भरतीची तयारी करत आहेत. याची जाणीव असतानाही राज्य शासनाने स्पर्धा परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. मात्र सदरील स्पर्धा परीक्षा शुल्कात कपात करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.26) विधान परिषदेत विशेष उल्लेखाव्दारे केली.
मागील 10 वर्षांपासून राज्यातील सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाकडून काही तरी अपेक्षा ठेऊन ग्रामीण भागातील असंख्य गोरगरीब विद्यार्थी शहरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. शिकवणी वर्ग, रहायची व्यवस्था, भोजन आदींचा खर्च आधीच या विद्यार्थ्यांना झेपणारा नाही. त्यात राज्य शासनाच्या विविध विभागांमधील भरतीसाठी स्पर्धा परीक्षा शुल्क 300 रू. वरून 1000 रू. करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. असंख्य विद्यार्थी पैशाअभावी अर्ज भरू शकत नसल्याने विविध परीक्षा देण्यापासून वंचित राहत आहेत.
त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता तसेच त्यांना एकापेक्षा अधिक स्पर्धा परीक्षा देता याव्यात यासाठी राज्य शासनाने स्पर्धा परीक्षा शुल्कात केलेली वाढ कमी करून 100 ते 150 रू. पर्यंत परीक्षा शुल्क आकारावे अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी विशेष उल्लेखाव्दारे सभागृहात केली.