बीड

मंत्री धनंजय मुंडे यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी‌ ; ५० लाखांची मागणी करीत दिली धमकी‌, शहर पोलीसात गुन्हा दाखल; ना. मुंडे आणि ना. भुजबळ दोघांनाही धमकी देणार्या आरोपीच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

परळी वैजनाथ दि ११ (लोकाशा न्युज) :-
मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ शिंदे – फडणवीस – पवार सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याची धमकी आली आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीतील संपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला होता. मला ५० लाख रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीवे मारिन अशी धमकी फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं दिली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार ना मुंडे आणि ना भुजबळ दोघांनाही धमकी देणारा आरोपी एकच असून त्याच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळीत जेरबंद केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मंत्री छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला. त्यापाठोपाठ मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकी देण्यात आली आहे. काल (सोमवारी) मध्यरात्री १२ वाजता एका अज्ञात व्यक्तीनं ८३०८६९३५५१ ह्या मोबाईल नंबर वरून ना धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयातील लॅण्डलाईन नंबर ०२४४६/२२५७७७ ह्या नंबर ला फोन करुन धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मला पन्नास लाख रुपये द्या, नाहीतर मी धनंजय मुंडे यांना जीवे मारिन, अशी धमकी फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीनं दिली. धनंजय मुंडे यांच्या परळी येथील संपर्क कार्यालयात असलेल्या वरील लँडलाईनवर धमकीचा फोन आला होता. या प्रकाराची माहिती तात्काळ राष्ट्रवादीचे नेते वाल्मीकअण्णा कराड यांनी परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांना दिली. पोनी सानप यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत, तपास सुरू केला आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात वाल्मीकअण्णा कराड यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गु र् नंबर १४१/२०२३ कलम ३८७, ५०७ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
(चौकट)
“आरोपीच्या मुसक्या आवळल्या”
प्राप्त माहितीनुसार ना धनंजय मुंडे आणि ना छगन भुजबळ यांना फोनवरून धमकी देणारा आरोपी एकच असून पुणे पोलिसांनी सदर आरोपीच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले आहे. आरोपीचे नाव प्रशांत पाटील असे असल्याचेही समजते. लवकरच सदर आरोपी परळी शहर पोलीसांच्या ताब्यात येईल अशी माहिती आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!