बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या निवडीसाठी उद्या दि. 2 जुलै 2023 रोजी निवडणूक होत आहे. सदरील निवडणूक घेण्यास मनाई करावी तसेच विद्यमान कार्यकारी मंडळास धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी यासाठी मशिप्र मंडळाचे सभासद मानसिंग पवार, विक्रम मुळे व युवराज मुळे यांनी औरंगाबाद येथील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात दोन स्वतंत्र याचिका/अर्ज सादर केले होते. मात्र मा.धर्मादाय सहआयुक्त यांनी गुणवत्तेच्या आधारे दोन्ही अर्ज फेटाळल्याने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या उद्या दि. 2 जुलै रोजी होणार्या निवडणूकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेळेच्या निवडणूकीत मंडळात अनेक बदल होतील असा कयास लावला जात होता, मात्र राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांनी यशस्वी मध्यस्थी करत या संस्थेत होणार्या राजकारणाला थांबा दिला आहे. त्यामुळे आजची निवडणूक बिनविरोध होणार असून अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके, सरचिटणीस पदी आ. सतिश चव्हाण आणि उपाध्यक्षपदी पुन्हा माजी आ. अमरसिंह पंडित दिसणार आहेत.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची सर्वसाधारण सभा उद्या दि. 2 जुलै 2023 रोजी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या रविंद्रनाथ टागोर सभागृहात मशिप्र मंडळाच्या घटनेत नमूद कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य (अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सरचिटणीस, दोन सहचिटणीस, कोषाध्यक्ष व कार्यकारी मंडळाचे चौदा सदस्य) यांच्या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. मात्र या निवडणूकीस स्थगिती द्यावी यासाठी मशिप्र मंडळाचे सदस्य मानसिंग पवार, चंद्रशेखर राजूरकर व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन रिट याचिकेव्दारे आव्हान दिले होते. सदरील याचिका मा.न्यायमूर्ती मंगेश पाटील व मा.न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या खंडपीठासमोर 21 जून रोजी सुनावणीस आली असता दोन्ही बाजूने युक्तीवाद करण्यात आला. युक्तीवादानंतर मा.उच्च न्यायालयाने मानसिंग पवार, चंद्रशेखर राजुरकर व इतरांनी दाखल केलेल्या रिट याचिका गुणवत्तेच्या आधारावर फेटाळत मशिप्र मंडळाच्या उद्या दि. 2 जुलै 2023 रोजी होणार्या निवडणूकीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यानंतर मा.धर्मादाय सहआयुक्त, औरंगाबाद यांच्या कार्यालयात महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41-अ अन्वये मानसिंग बाळासाहेब पवार तसेच विक्रम सुधाकर मुळे व युवराज शरद मुळे यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची दि. उद्या 2 जुलै 2023 रोजी 10.7.2023 ते 9.7.2028 या कालावधीसाठी नवीन कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यास बदल अर्ज 761/2018 मधील अंतिम निकाल होईपर्यंत मनाई करावी तसेच विद्यमान कार्यकारी मंडळास कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी यासाठी दोन स्वतंत्र याचिका/अर्ज सादर केले होते. वरील दोन्ही अर्जावर दि.30 जून रोजी मा.धर्मादाय सहआयुक्त यांच्यासमोर दोन्ही बाजूच्या वकीलांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकूण मा.धर्मादाय सहआयुक्त यांनी मानसिंग पवार व इतरांचे दोन्ही अर्ज फेटाळले. त्यामुळे उद्या दि. 2 जुलै 2023 रोजी होणार्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणूकीचा मार्ग आता अखेर मोकळा झाला आहे. मशिप्र मंडळाच्यावतीने अॅड नंदकुमार खंदारे, अॅड श्रीकांत अदवंत, अॅड प्रशांत निकम तर हस्तक्षेपकार नितीन बागवे यांच्यावतीने अॅड. दिलीप चौधरी यांनी काम पाहिले. सर्वात महत्वाचे म्हणजे या वेळेच्या निवडणूकीत मंडळात अनेक बदल होतील असा कयास लावला जात होता, मात्र राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारांनी यशस्वी मध्यस्थी करत या संस्थेत होणार्या राजकारणाला थांबा दिला आहे. त्यामुळे उद्याची निवडणूक बिनविरोध होणार असून अध्यक्षपदी आ. प्रकाश सोळंके, सरचिटणीस पदी आ. सतिश चव्हाण आणि उपाध्यक्षपदी पुन्हा माजी आ. अमरसिंह पंडित पहायला मिळणार आहेत.
संस्थेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध
करण्याचा एकमुखी घेतला निर्णय
मराठवाड्यात सगळ्या मोठी शैक्षणिक संस्था म्हणून मशिप्र’ मंडळाची ओळख आहे, त्यामुळे या संस्थेत राजकारण करायचे नाही, या संस्थेच्या हितासाठी सर्व एकजुटीने काम करू, असा निर्णय झाला आहे. त्यामुळेच उद्याची मशिप्र मंडळाची होणारी निवडणूक ही बिनविरोध होणार आहे.















