बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : कन्हेवाडी (ता. परळी) चे भुमिपुत्र असलेले आयकर अधिकारी विश्वास मुंडे यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगरला बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त आयकर आयुक्त (न्यास) म्हणून त्यांची याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे संपूर्ण मराठवाड्यासह खान्देशची जबाबदारी असणार आहे. पुढच्या आठवड्यात ते आपल्या पदाचा पदभार स्विकारून प्रत्यक्ष कामाला सुरवात करणार आहेत.
एक मागास जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहिले जाते, मात्र याच जिल्ह्यात रत्नांची खान आहे, हे अनेक तरूणांनी आपल्या कर्तृत्वातून खर्या अर्थाने सिध्द करून दाखविलेले आहे. कन्हेरवाडी (ता.परळी) येथील विश्वास मुंडे यांचाही जिवनप्रवास असाच संघर्षमयी आहे, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच यश मिळवत त्यांनी आयकर विभागात आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला आहे. मागच्या तीन दिवसांपुर्वीच त्यांची कोल्हापुर येथून छत्रपती संभाजी नगरला बदली करण्यात आली आहे. याठिकाणी त्यांची अतिरिक्त आयकर आयुक्त (न्यास) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कामातील प्रमाणिकपणा आणि काम करण्याची गती लक्षात घेवूनच त्यांच्याकडे संपूर्ण मराठवाड्यासह खान्देशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते बीडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचे पती आहेत. वास्तविक पाहता ते दोघेही आपआपल्या कामात कर्तव्यदक्ष आहेत, त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील अनेक गोरगरिबांचे प्रश्न खर्या अर्थाने मार्गी लागणार आहेत. दरम्यान पुढच्या आठवड्यात आपल्या पदाचा पदभार स्विकारून विश्वास मुंडे हे प्रत्यक्ष कामाला सुरूवात करणार आहेत.















